पांचगणी न्यूज नेटवर्क
पाचवड : “गेली अनेक वर्षे आपण ज्या राजकीय नेत्यांना मते देऊन मोठे केले, त्यांनी मराठा समाजाचा कधीही मनापासून विचार केला नाही. त्यामुळे इथून पुढे जो लोकप्रतिनिधी मराठ्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहील, मग तो कोणत्याही पक्षाचा असो, त्याच्याच पाठीशी मराठा समाजाने उभे राहिले पाहिजे. भावी पिढीच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि आपल्या अस्तित्वासाठी इतर कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता हक्काचे आरक्षण मिळवणे हीच आपली अंतिम ध्येयगाठ आहे. यासाठीची ही शेवटची आरपारची लढाई येत्या २९ ऑगस्टपासून पुन्हा एकदा अंतरवाली सराटी येथे सुरू होत आहे,” अशी वज्रमुठ आवळत मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी पाचवड (ता. कराड) येथील विराट सभेत हुंकार भरला.
पाचवड येथे आयोजित भव्य जाहीर सभेत जरांगे पाटील बोलत होते. या वेळी व्यासपीठावर पश्चिम महाराष्ट्र मराठा महासंघाचे अध्यक्ष बाळासाहेब पवार, अखिल भारतीय मराठा महासंघ सातारा जिल्हा दक्षिण विभाग प्रमुख प्रदीप पाटील, पै. नाना पाटील, हर्षवर्धन पाटील, किरण पाटील, मलकापूरच्या नगरसेविका स्वाती जाधव, पै. राहुल निकम यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
सभेला संबोधित करताना मनोज जरांगे पाटील म्हणाले, “शासनाच्या धरसोड वृत्तीच्या धोरणामुळे मराठा समाजात तीव्र संतापाची लाट पसरली आहे. आगामी काळात होणाऱ्या राजकीय व सामाजिक परिणामांना सर्वस्वी शासनच जबाबदार राहील. कुणबी जात प्रमाणपत्र आणि नोंदी तपासणीचे काम अत्यंत पारदर्शकपणे सुरू असतानाच महसूल मंत्री बावनकुळे यांनी यात खोडा घालण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची फूस आहे. महसूल मंत्र्यांच्या या भूमिकेचा सर्व पुरावा आपल्या हाती आला असून, अशा प्रकारे मराठ्यांच्या पाठीत खंजीर उपसणाऱ्या कोणालाही समाज माफ करणार नाही.”
पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाजाच्या जागरूकतेचे कौतुक करत ते म्हणाले, “पश्चिम महाराष्ट्र आर्थिक व सामाजिकदृष्ट्या प्रगत मानला जात असला, तरी आज तटपुंज्या जमिनी, नोकऱ्यांचा अभाव आणि व्यवसायातील अडचणींमुळे तरुण वर्ग आर्थिक संकटात सापडला आहे. या सर्व समस्यांवर एकमेव उपाय म्हणजे आरक्षण! मी कोणताही वैयक्तिक स्वार्थ किंवा राजकीय पक्षाच्या फायद्यासाठी नव्हे, तर मराठ्यांच्या लेकरांच्या हक्कासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढणार आहे. मराठा तरुणांमध्ये आलेली राजकीय जागृती आणि समाजाने दिलेली भक्कम साथ हीच माझी खरी ताकद आहे.”
मराठा लोकप्रतिनिधींचे मौन हे दुर्दैव!……
सभेनंतर पत्रकारांशी बोलताना जरांगे पाटील यांनी सत्ताधारी व विरोधी पक्षातील मराठा नेत्यांवर निशाणा साधला. “मराठा समाजाच्या जीवावर ज्यांनी सत्ता उपभोगली आणि मोठे राजकीय स्थान मिळवले, तेच मराठा लोकप्रतिनिधी आज समाजाच्या हक्कासाठी तोंड उघडायला तयार नाहीत, हे अत्यंत दुर्दैवी आहे. मात्र, मराठा समाजात सत्ता पालटण्याची आणि परिवर्तन घडवून आणण्याची मोठी ताकद आहे. ज्यांनी मराठ्यांचा केवळ वापर करून घेतला, त्यांना येणाऱ्या काळात त्यांची योग्य जागा दाखवून दिल्याशिवाय हा समाज गप्प बसणार नाही,” असा टोलाही त्यांनी या वेळी लगावला.
या सभेला कराड तालुक्यातील काले, आटके, वाठार यांसह अनेक गावांतील मराठा कार्यकर्ते आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



