Home » पांचगणी » नशामुक्त भारतासाठी पांचगणीत विद्यार्थ्यांचा ‘अभिनय जागर’; रोटरॅक्ट क्लब अन् विद्या निकेतनच्या पथनाट्याने वेधले लक्ष

नशामुक्त भारतासाठी पांचगणीत विद्यार्थ्यांचा ‘अभिनय जागर’; रोटरॅक्ट क्लब अन् विद्या निकेतनच्या पथनाट्याने वेधले लक्ष

पांचगणी न्यूज नेटवर्क
पांचगणी : हातात फडकणारा तिरंगा, ओठांवर देशभक्तीच्या उत्स्फूर्त घोषणा आणि मनात समृद्ध, व्यसनमुक्त भारताचा ठाम संकल्प… स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून पर्यटन नगरी पांचगणीच्या मुख्य बाजारपेठेत शनिवारी एक वेगळाच सामाजिक जागर पाहायला मिळाला. रोटरॅक्ट क्लब ऑफ पांचगणी आणि विद्या निकेतन हायस्कूलच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जनजागृती अभियानात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या ‘नशामुक्त भारत’ पथनाट्याने पर्यटकांसह स्थानिक नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.

​”स्वातंत्र्य ही केवळ एक भावना नसून ती जबाबदारी आहे,” या संकल्पनेतून साकारलेल्या या उपक्रमात १७ विद्यार्थी आणि दोन शिक्षकांनी सक्रिय सहभाग नोंदवला. सध्याची तरुण पिढी व्यसनाच्या गर्तेत कशी अडकत चालली आहे, त्यातून सुखी कुटुंबे कशी उद्ध्वस्त होतात आणि या सामाजिक किडीतून बाहेर पडण्यासाठी व्यसनमुक्तीची किती तीव्र गरज आहे, याचे वास्तववादी चित्रण विद्यार्थ्यांनी आपल्या आशयघन अभिनयातून व संवादांतून हुबेहूब मांडले. बाजारपेठेत गर्दीच्या ठिकाणी रंगलेल्या या पथनाट्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

​हा उपक्रम रोटरॅक्ट क्लब ऑफ पांचगणीचे अध्यक्ष अमेय भिलारे यांच्या नेतृत्वाखाली आणि उपाध्यक्ष अथर्व बिरामणे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पडला. कार्यक्रमास पांचगणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार व त्यांच्या सहकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी बोलताना अधिकाऱ्यांनी, तरुणाईला नशा आणि गुन्हेगारीपासून दूर ठेवण्यासाठी सामाजिक संस्था आणि शाळांनी पुढे येणे अत्यंत गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले.
​यावेळी पांचगणी नगरपालिकेचे नगराध्यक्ष दिलीप बगाडे , शेखर कासुर्डे, नरेंद्र बिरामणे, प्रकाश गोळे, प्रसाद कारंजकर यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर, रोटरॅक्टचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

​”व्यसनाला नकार द्या; आयुष्याला होकार द्या!” हा मध्यवर्ती संदेश देत विद्यार्थ्यांनी उपस्थितांना व्यसनमुक्तीची शपथ दिली. स्वातंत्र्यदिनाचा उत्सव केवळ औपचारिक ध्वजारोहणापुरता सीमित न ठेवता, त्याला सामाजिक बांधिलकीची जोड देणाऱ्या या उपक्रमाचे पांचगणी आणि परिसरभरातून कौतुक होत आहे.

Facebook
X
WhatsApp
Telegram

203K

Facebook Fans

103K

Followers

203K

Subscriber

113K

Followers