पांचगणी न्यूज नेटवर्क
पांचगणी : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला गती मिळावी आणि प्रतिकूल हवामानातही त्यांचा शालेय प्रवास सुकर व्हावा, या सामाजिक बांधिलकीतून लायन्स क्लब पुणे रहाटणी यांच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पांगारी येथील विद्यार्थ्यांना स्कूल बॅग व रेनकोटचे वाटप करण्यात आले. शैक्षणिक साहित्याची मदत मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एमजेएफ लायन राजेश कोठावदे उपस्थित होते. याप्रसंगी क्लबचे सचिव लायन डॉ. निपुण जाधव, खजिनदार लायन शिंगाडे, लायन विक्रमसिंह शकतावत, पांगारी शाळेचे मुख्याध्यापक आंब्राळे, माजी सरपंच जाणू पांगारे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेंद्र पांगारे यांच्यासह लायन्स क्लबचे सदस्य, शिक्षक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमादरम्यान पार्थ या विद्यार्थ्याने अत्यंत आत्मविश्वासाने व प्रभावी भाषण करत उपस्थित मान्यवरांची मन जिंकली. त्याने उपक्रमाबद्दल आभार मानत लायन्स क्लबच्या नूतन अध्यक्ष व सचिवांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. पार्थच्या या प्रगल्भ भाषणाचे कौतुक करताना अध्यक्ष राजेश कोठावदे भावुक झाले. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात पार्थच्या वक्तृत्वाचे कौतुक करत “तुझ्यातील नेतृत्वगुण पाहून भविष्यात तू नक्कीच लायन्स क्लबचा अध्यक्ष होशील,” असा विश्वास व्यक्त केला.
तसेच, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शुद्ध व सुरक्षित पिण्याचे पाणी मिळावे यासाठी लायन्स क्लबच्या वतीने पांगारी शाळेला लवकरच वॉटर फिल्टर बसवून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. यापुढेही शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी आणि विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार सातत्याने मदत उपक्रम राबवले जातील, अशी ग्वाही क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.
शैक्षणिक साहित्याच्या वाटपामुळे विद्यार्थ्यांचा शैक्षणिक उत्साह वाढण्यास मदत होणार असून, लायन्स क्लब पुणे रहाटणीने दाखवलेल्या या सामाजिक संवेदनशीलतेचे पांगारी आणि परिसरातील पालकांनी व ग्रामस्थांनी मनापासून आभार मानले.



