पांचगणी न्यूज नेटवर्क
महाबळेश्वर : श्री क्षेत्र महाबळेश्वर येथील अतिप्राचीन व ऐतिहासिक महत्त्व लाभलेल्या श्री स्वयंभू शंकर महादेव, अतिबलेश्वर आणि पंचगंगा कृष्णामाई मंदिरांचे धार्मिक पावित्र्य व भारतीय संस्कृतीचे जतन करण्यासाठी मंदिरात येणाऱ्या भाविकांना पूर्ण आणि सात्विक पोशाख (ड्रेस कोड) सक्तीचा करण्यात यावा, अशी आग्रही मागणी शिवसेना महिला वाई विधानसभा समन्वयक सौ. वर्षा किरण आरडे यांनी महाबळेश्वरच्या तहसीलदारांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
श्री क्षेत्र महाबळेश्वर हे संपूर्ण भारतातील हिंदू भाविकांचे एक प्रमुख आणि अतीव श्रद्धेचे देवस्थान मानले जाते. या भूमीला मोठा ऐतिहासिक वारसा लाभलेला असून, स्वराज्य संस्थापक रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्या मातोश्री राजमाता जिजाऊ यांची सुवर्णतुला याच पवित्र तीर्थक्षेत्री केली होती. त्यामुळे या क्षेत्राला धार्मिकतेसोबतच एक अद्वितीय ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे. दररोज देश-विदेशातून हजारो भाविक आणि पर्यटक येथे मोठ्या भक्तिभावाने दर्शनासाठी येत असतात.
सध्या महाबळेश्वर हे एक प्रमुख पर्यटन स्थळ म्हणून वेगाने नावारूपाला येत आहे. पर्यटनाच्या ओघात मंदिरांच्या मूळ धार्मिक व सात्विक वातावरणाला बाधा पोहोचू नये आणि देवस्थानांचे पावित्र्य अबाधित राहावे, यासाठी मंदिरात प्रवेश करताना भाविकांनी अंगभर आणि योग्य पोशाख परिधान करणे अत्यंत आवश्यक बनले आहे.
मंदिरात प्रवेश करताना केवळ आपल्या समृद्ध संस्कृतीचे दर्शन व्हावे आणि पवित्र वातावरणात सर्वांना देवतांचे आशीर्वाद प्राप्त व्हावेत, हाच या मागणीमागचा मुख्य उद्देश आहे. लाखो भाविकांची श्रद्धा लक्षात घेता ही मागणी अत्यंत रास्त आणि वास्तववादी असून, प्रशासनाने यावर तत्परतेने व सहानुभूतीपूर्वक सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी विनंती सौ. वर्षा आरडे यांनी दिलेल्या निवेदनात केली आहे.



