पाचगणी न्यूज नेटवर्क
पांचगणी : पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या पाचगणी शहरालगतच्या तायघाट (ता. महाबळेश्वर) परिसरात रविवारी भल्या पहाटे थेट मानवी वस्तीजवळ बिबट्याचे दर्शन झाल्याने स्थानिक नागरिक आणि पर्यटकांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे. तायघाट येथील वाहनतळावर असलेल्या वीज वितरणाच्या डीपीजवळ (DP) रस्त्याकाठीच एक पूर्ण वाढ झालेला बिबट्या संशयितरीत्या वावरताना आढळून आला.
स्थानिक नागरिक अनिकेत बेलोशे हे सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास तायघाट परिसरातून जात असताना त्यांना डीपीजवळ बिबट्या बसलेला दिसला. त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता अत्यंत प्रसंगावधान राखून आपल्या मोबाईलमध्ये या बिबट्याचे थरारक चित्रीकरण (व्हिडिओ) केले. काही वेळातच हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
मानवी वस्ती आणि बंगल्यांच्या परिसरात बिबट्याचा वावर
तायघाट आणि लगतचा परिसर घनदाट वनराईने नटलेला असल्याने या भागात वन्यजीवांचा नैसर्गिक अधिवास आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून हा बिबट्या थेट बंगल्यांच्या आवारात आणि मुख्य रस्त्यांवर फिरताना अनेक ठिकाणी सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यांमध्ये कैद झाला आहे. त्यामुळे हा वावर केवळ जंगलापुरता मर्यादित न राहता मानवी वस्तीसाठी धोक्याची घंटा ठरत आहे.
पांगारीतील घटनेची पुनरावृत्ती होण्याची भीती
गेल्या वर्षी पाचगणी जवळील पांगारी आणि भोसे सीमा परिसरात बिबट्याने असाच धुमाकूळ घातला होता. त्यावेळी संतप्त ग्रामस्थांनी महाबळेश्वर वनविभागाकडे पाठपुरावा करून पिंजरा लावण्यास भाग पाडले होते आणि अखेर वनविभागाच्या पिंजऱ्यात एक बिबट्या जेरबंद झाला होता. आता पुन्हा एकदा तायघाट परिसरात बिबट्याचा थेट वावर वाढल्याने जुन्या घटनांची पुनरावृत्ती होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
वनविभागाने तातडीने गस्त वाढवून पिंजरा लावावा: ग्रामस्थांची मागणी
या घटनेनंतर तायघाट, भोसे, पांगारी आणि पाचगणी परिसरातील ग्रामस्थांनी वनविभागाच्या कारभारावर चिंता व्यक्त केली आहे. वनविभागाने तातडीने या परिसरात ट्रॅप कॅमेरे बसवून बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवावे, रात्रीच्या वेळी वन कर्मचाऱ्यांची गस्त (पेट्रोलिंग) वाढवावी आणि आवश्यक असल्यास पिंजरा लावून या बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
रात्री-अपरात्री बाहेर पडताना काळजी घेण्याचे आवाहन
बिबट्याचा मुक्त वावर लक्षात घेता तायघाट व पाचगणी परिसरातील नागरिकांनी आणि पर्यटकांनी रात्रीच्या वेळी किंवा भल्या पहाटे निर्जन भागात एकटे जाणे टाळावे. विशेषतः लहान मुले व पाळीव प्राण्यांची योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन स्थानिक प्रशासनाकडून करण्यात येत आहे.



