पांचगणी न्यूज नेटवर्क
पाचगणी : निसर्गसौंदर्याने नटलेल्या पाचगणी या जगप्रसिद्ध पर्यटननगरीला सध्या अस्वच्छतेचा मोठा फटका बसत आहे. शहरातील शिवाजीनगर परिसरातील बेल एअर हॉस्पिटल ते बेबी पॉईंट या मुख्य रस्त्यावर गेल्या काही दिवसांपासून एका हॉटेलच्या मलवाहिनीच्या चेंबरमधून मैला आणि सांडपाणी थेट रस्त्यावरून ओसंडून वाहत आहे. यामुळे परिसरात उग्र दुर्गंधी पसरली असून, स्थानिक नागरिकांसह पर्यटकांनाही अक्षरशः नाक मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. प्रशासनाच्या या उदासीन कारभाराविरुद्ध नागरिकांमधून प्रचंड संताप व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सदर ठिकाणी एका खासगी मालकाच्या हद्दीतून जाणाऱ्या ड्रेनेज लाईनचे चेंबर तुंबल्याने हे दूषित सांडपाणी रस्त्यावर येत आहे. या मार्गावर दिवसभर विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिला आणि पर्यटकांची मोठी वर्दळ असते. मात्र, रस्त्यावर दूषित पाण्याचे डबके साचल्यामुळे पादचाऱ्यांना चालणेही अशक्य झाले आहे. रस्त्यावर साचलेल्या चिखलामुळे आणि निसरडेपणामुळे दुचाकी घसरून लहान-मोठे अपघात घडत आहेत. वाहने गेल्यानंतर हे घाण पाणी अंगावर उडत असल्याने नागरिक आणि वाहनचालकांमध्ये रोज खटके उडत आहेत.
या सांडपाण्यामुळे परिसरात डासांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले असून, डेंग्यू, मलेरिया आणि अतिसारासारख्या संसर्गजन्य आजारांची साथ पसरण्याची भीती निर्माण झाली आहे.
एकीकडे स्वच्छता सर्व्हेक्षणाचे दावे केले जात असताना, दुसरीकडे पर्यटननगरीच्या मुख्य रस्त्यावर वाहणारी ही ‘गटारगंगा’ पाचगणीच्या सौंदर्याला आणि प्रतिमेला मोठा डाग लावत आहे. यामुळे येथे येणाऱ्या पर्यटकांमध्येही अत्यंत चुकीचा संदेश जात आहे.
संबंधित नगर पालिका प्रशासनाने संबंधीत हॉटेल मालकाला आदेश देऊन मलमपट्टी न करता या ड्रेनेज लाईनची तातडीने पाहणी करून कायमस्वरूपी दुरुस्ती करावी, साचलेले पाणी हटवून संपूर्ण परिसराचे निर्जंतुकीकरण करावे, अशी ठाम मागणी शिवाजीनगर भागातील रहिवाशांनी केली आहे. या हॉटेल मालकाची ही गटार गंगा नेहमी या रस्त्यावर येते त्यांना कसलाही धाक बसला नाही. संबंधीत विभागाने ही ड्रेनेज व्यवस्था कार्ता येत नसेल तर हॉटेल परवाना रद्द करावा अशी मागणी नागरीक करीत आहेत.
नागरिकांच्या आरोग्याशी खेळ थांबवा!
शिवाजीनगर परिसरातील ही ड्रेनेज लाईन वारंवार तुंबून पाणी रस्त्यावर येण्याचा प्रकार नवीन नाही. पर्यटननगरीत आरोग्याचा प्रश्न गंभीर बनत चालला असून, प्रशासनाने केवळ नोटीस बजावण्याचे काम न करता थेट ठोस कारवाई करून ही समस्या मुळापासून सोडावावी; अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा स्थानिक रहिवाशांनी दिला आहे



