पांचगणी न्यूज नेटवर्क
पाचगणी, ता. २८ (प्रतिनिधी) : महाबळेश्वर आणि पाचगणी या पश्चिम घाटातील प्रमुख पर्यटनस्थळांना जोडणाऱ्या रस्त्याचे काम वर्षभरापासून रखडल्याने लोकप्रतिनिधींनी आज आक्रमक पवित्रा घेत रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी करून अक्षरशः पंचनामा केला. ठेकेदाराने तातडीने सकारात्मकता दाखवून काम पूर्ण न केल्यास नेते राजेंद्रशेठ राजपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली, प्रसंगी सर्वपक्षीय लोकांना एकत्र करून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा थेट इशारा पंचायत समिती सभापती शकुंतला चोरमले यांनी दिला आहे.
सध्या या मार्गावर खडी व खड्ड्यांमुळे पर्यटकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. शनिवार-रविवार आणि सुट्ट्यांमध्ये महाबळेश्वर-पाचगणीच्या थंड हवेच्या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांची सोशल मीडियावरील नाराजी आता या दोन्ही पर्यटनस्थळांच्या प्रतिमेला तडा देऊ लागली आहे. हॉटेल, लॉजिंग, रिसॉर्ट, टॅक्सी, घोडागाडी चालकांसह छोट्या-मोठ्या व्यावसायिकांवर याचा थेट परिणाम होत आहे. पर्यटकांच्या प्रवासाचा वेग मंदावत असल्याने आणि वाहनांचे नुकसान होत असल्याने पर्यटक या मार्गावर येण्यास टाळाटाळ करत असल्याचे चित्र आहे. सार्वजनिक पैशातून काम होत असतानाही वर्षभर काम रखडतेच कसे, नागरिकांच्या सुरक्षिततेशी खेळण्याचा अधिकार ठेकेदाराला कोणी दिला आणि संबंधित विभागाचा ठेकेदारावर वचक आहे की नाही, असे परखड सवाल सदस्या वंदनाताई भिलारे यांनी उपस्थित केले.
एकीकडे महाबळेश्वर-पाचगणी परिसरातील पर्यटनाला चालना देण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात असताना दुसरीकडे मूलभूत सुविधांअभावी पर्यटनाच्या अर्थव्यवस्थेला घरघर लागल्याचे वास्तव समोर आले आहे. केवळ कामाचा ठेका घेतला म्हणजे मनमानी करण्याची मुभा मिळते का, असा सवाल करत ठेकेदाराच्या वर्षभराच्या कामकाजाची तातडीने आणि गांभीर्याने चौकशी करण्याची मागणीही सभापती चोरमले यांनी केली आहे.
पाहणीदरम्यान जिल्हा परिषद सदस्य संजय केळगणे, पंचायत समिती सदस्य वंदनाताई भिलारे, जिल्हा समन्वय समिती सदस्य प्रवीण भिलारे, कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य राजेंद्र भिलारे आणि गुरेघरचे सरपंच रमेश चोरमले यांच्यासह स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते. सर्वांनी रस्त्यावरील खडी हातात घेऊन ठेकेदाराच्या दिरंगाईचा निषेध नोंदवला. हा मार्ग केवळ दोन शहरांना जोडणारा रस्ता नसून या भागाच्या पर्यटनाची जीवनवाहिनी आहे; त्यामुळे ठेकेदाराच्या पोकळ आश्वासनांपेक्षा प्रत्यक्ष कामाला महत्त्व देत मार्ग सुरक्षित व सुरळीत करावा, अन्यथा लोकप्रतिनिधी आणि नागरिक रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करतील, असा स्पष्ट इशारा देण्यात आला.
’जहागिरी’ कामातून दाखवा, अन्यथा उत्तर देऊ : प्रवीण भिलारे
यापूर्वी झालेल्या बैठकीत ठेकेदाराने ‘आम्ही चिल्लर नाही’ अशा आविर्भावात वक्तव्य केले होते. मात्र, बैठकीत दिलेल्या मुदतीनंतरही रस्त्याचे काम प्रत्यक्षात पूर्ण झालेले नाही. मग आता ठेकेदाराची ती ‘जहागिरी’ कुठे गेली, ती त्यांनी थेट कामातून दाखवून द्यावी. वर्षभरापासून काम रखडलेले असताना संबंधित यंत्रणा नेमकी काय करत आहे, असा सवाल करत काम लवकर मार्गी लागले नाही, तर तुम्ही चिल्लर आहात की जहागीरदार हे आम्हीच दाखवून देऊ, असा संतप्त इशारा जिल्हा समन्वय समिती सदस्य प्रवीण भिलारे यांनी दिला.



