पांचगणी न्यूज नेटवर्क
पाचगणी, ता. २८ : ‘आय लव्ह पाचगणी’ फेस्टिव्हलच्या निमित्ताने विस्तीर्ण टेबल लँडवर रंगलेल्या पतंगोत्सवाने आज वेगळीच उंची गाठली असून पर्यटकांची मोठी गर्दी उसळली. निळ्याशार आकाशात झेपावणाऱ्या रंगीबेरंगी पतंगांसोबतच मराठी अभिनेता संदीप गायकवाड आणि गौरव मोरे यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला चार चांद लावले; तर त्यानंतर रेमो डिसोझा आणि किरण गिरी यांच्या सादरीकरणाने सोहळ्यातील रंगत शिगेला पोचवली.
सह्याद्रीच्या कुशीतील निसर्गरम्य टेबल लँडवर विविध आकार व रंगांच्या पतंगांची उधळण पाहण्यासाठी दिवसभर पर्यटक व स्थानिक नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. गुजरात, पुणे आणि मुंबई येथून आलेल्या अनुभवी पतंगप्रेमींच्या पथकांनी आकाशात विविध कसरती सादर करत उपस्थितांची दाद मिळवली. बच्चे कंपनीने स्वतः पतंग उडविण्याचा आनंद लुटला, तर पालकांनीही बालपणीच्या आठवणींना उजाळा देत या सोहळ्यात सहभाग घेतला. अनेक पर्यटकांनी आकाशातील रंगीबेरंगी दृश्यांचे फोटो व व्हिडिओ मोबाईलमध्ये टिपले आणि हा सोहळा सोशल मीडियावरही झळकला.
फेस्टिव्हलमध्ये मनोरंजन आणि कलाविष्कारासोबतच खवय्यांचीही मोठी चंगळ झाली. विविध खाद्यपदार्थांच्या स्टॉल्सवर पर्यटकांनी मनसोक्त आस्वाद घेत पाचगणीच्या थंड हवेतील पर्यटनाची दुहेरी पर्वणी साधली. स्थानिक चवींसह विविध पदार्थांची रेलचेल असल्याने खवय्यांचा उत्साह द्विगुणित झाला. वीकेंडच्या सुट्ट्या आणि फेस्टिव्हलच्या निमित्ताने पाचगणीत आलेल्या पर्यटकांचा उत्साह गगनाला भिडला होता.
पाचगणीच्या पर्यटनाला नवी ओळख देणारा, पर्यटकांचा मुक्काम अधिक आनंददायी करणारा आणि स्थानिक पर्यटन अर्थव्यवस्थेला उभारी देणारा हा पतंगोत्सव निसर्गसौंदर्य, कला आणि उत्साहाचा सुरेख संगम ठरला. दिवसभर चाललेल्या या रंगारंग उपक्रमामुळे टेबल लँड परिसर आनंद, जल्लोष आणि उत्साहपूर्ण वातावरणात न्हाऊन निघाला. तर सायंकाळी संजीवनचे शरद पंडित स्टेडीयम सुमधुर गीतांनी आणी लाईटच्या झगमटाने उजळून गेले होते.



