Home » जावळी » ‘काखेला कळसा, गावाला वळसा’; सातारा बसस्थानकाच्या गलथान कारभारावर प्रवासी आक्रमक

‘काखेला कळसा, गावाला वळसा’; सातारा बसस्थानकाच्या गलथान कारभारावर प्रवासी आक्रमक

दोन वर्षांपासून चुकीच्या मार्गाने बस फिरवून प्रवाशांच्या खिशाला डबा; अस्वच्छता आणि सोयी-सुविधांच्या अभावामुळे संतापाची लाट

पांचगणी न्यूज नेटवर्क /जितीन वेंदे

कुसुंबी : जिल्ह्याचे मध्यवर्ती केंद्र आणि रोज हजारो प्रवाशांचे आश्रयस्थान असलेले सातारा बसस्थानक सध्या प्रशासकीय अनास्था आणि गैरव्यवस्थेचे केंद्र बनले आहे. गेल्या दोन वर्षांपासून एसटी प्रशासनाकडून चुकीच्या मार्गाने बस फिरवून प्रवाशांवर extra भाड्याचा आर्थिक भुर्दंड लादला जात असून, स्थानकातील अस्वच्छता आणि असुविधांमुळे प्रवाशांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

​पूर्वी सातारा बसस्थानकात येण्यासाठी आणि बाहेर पडण्यासाठी दोन वेगळी प्रवेशद्वारे सुरू होती. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून बाहेरील प्रवेशद्वाराच्या नियोजनात बदल करण्यात आला आहे. त्यामुळे मेढा, वाई आणि महाबळेश्वरच्या दिशेने जाणाऱ्या बसेसना बसस्थानकातून बाहेर पडल्यानंतर थेट जाण्याऐवजी पवई नाका आणि पोस्ट ऑफिस असा पूर्ण गावाला वळसा घालून पुन्हा खालच्या चौकातून मार्गस्थ व्हावे लागत आहे. प्रशासनाच्या या अजब आणि चुकीच्या मार्गामुळे सातारा ते मेढा मार्गावरील प्रवाशांना प्रति प्रवासी ७ ते ८ रुपये अतिरिक्त भाडे मोजावे लागत आहे. ‘इंधन वाचवा’चा नारा देणाऱ्या एसटी महामंडळानेच गेल्या दोन वर्षांत या वळसा मार्गामुळे प्रवाशांच्या खिशाला लाखोंचा चुना लावल्याचा आरोप केला जात आहे.

​आर्थिक लुटीसोबतच स्थानकातील असुविधांनी सीमा गाठली आहे. बसस्थानकातील स्वच्छतागृहांची दुर्दशा झाली असून परिसरात पसरलेल्या दुर्गंधीमुळे प्रवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. मोफत स्वच्छतागृहाची घोषणा कागदावरच राहून अप्रत्यक्षपणे पैसे उकळले जात असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. याशिवाय, ग्रामीण भागात जाणाऱ्या बसेस नियोजित फलाटावर न लावता कोपऱ्यात उभ्या केल्या जात असल्याने वयोवृद्ध आणि लहान मुलांची प्रचंड हेळसांड होत आहे.

 

​”शासनाने एकीकडे ‘इंधन वाचवा’ असे फलक लावायचे आणि दुसरीकडे एसटी प्रशासनानेच बसचा मार्ग विनाकारण लांबवून प्रवाशांकडून अतिरिक्त पैसे उकळायचे, हा सरळसरळ अन्याय आहे. स्थानकासमोरील मार्ग एसटी बसेससाठी तात्काळ मोकळा करून प्रवाशांचा आर्थिक भुर्दंड थांबवावा आणि स्थानकातील अस्वच्छता दूर करावी.”

— गोपाळ जाधव (प्रवासी व समाजसेवक, जाधव उंबरी)

​तीन प्रमुख समस्यांमुळे प्रवासी त्रस्त:

​आर्थिक फटका: वळसा मार्गामुळे गेल्या २ वर्षांपासून प्रति प्रवासी ७ ते ८ रुपयांचा अतिरिक्त भुर्दंड.

​ज्येष्ठांची परवड: ग्रामीण बसेस फलाटावर न लावता कोपऱ्यात उभ्या केल्याने चालताना वयोवृद्धांची दमछाक.

​दुर्गंधीचे साम्राज्य: स्वच्छतागृहांची प्रचंड अस्वच्छता, पाण्याची टंचाई आणि मोफत सुविधेच्या नावाने वसुली.

Facebook
X
WhatsApp
Telegram

203K

Facebook Fans

103K

Followers

203K

Subscriber

113K

Followers