पांचगणी न्यूज नेटवर्क
पाचगणी : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार महाबळेश्वर तालुक्यात सुरू असलेल्या मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरिक्षणाने (SIR) मोठा टप्पा गाठला आहे. या अभियानांतर्गत गोडवली गावातील सर्व मतदारांची माहिती पडताळणी व अद्ययावतीकरणाचे काम १०० टक्के पूर्ण झाले असून, प्रशासनाने आखलेली ही धडाकेबाज मोहीम आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे.
३० जूनपासून सुरू झालेल्या या मोहिमेत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) व महसूल कर्मचाऱ्यांचे पथक घरोघरी जाऊन मतदारांचा पत्ता, दुबार नोंदी, स्थलांतरित व्यक्तींची माहिती आणि त्रुटींची बारकाईने तपासणी करत आहे. महाबळेश्वरचे तहसीलदार सचिन मस्के यांच्या नेतृत्वाखाली हे संपूर्ण अभियान युद्धपातळीवर राबवले जात आहे.
सध्या अभियानाचा अत्यंत महत्त्वाचा टप्पा सुरू असून ३ ते ८ ऑगस्टदरम्यान ‘अनकलेक्टेबल फॉर्म’ची फेरपडताळणी, मॅपिंग न झालेल्या मतदारांची माहिती अद्ययावत करणे आणि डिजिटाइज झालेल्या नोंदींची अंतिम तपासणी केली जात आहे.
”या अभियानामुळे तालुक्यातील एकही पात्र मतदार मतदानापासून वंचित राहणार नाही. गोडवलीप्रमाणेच तालुक्यातील प्रत्येक गावातील मतदार यादी पूर्णपणे अचूक, पारदर्शक आणि अद्ययावत करण्याचा प्रशासनाचा मानस आहे.”
— विनोद सावंत, नायब तहसीलदार
या मोहिमेच्या यशस्वीतेसाठी नायब तहसीलदार विनोद सावंत, निवडणूक नायब तहसीलदार जहिदा शेख, पर्यवेक्षक अधिकारी दीपक बोर्डे, मंडळाधिकारी विजय खरात, तलाठी सुदाम मामलीवाड, तलाठी अजय रसाळ, बीएलओ सुषमा मालुसरे यांच्यासह शिक्षक, आशा व अंगणवाडी सेविका आणि आयटी टीम अहोरात्र परिश्रम घेत आहेत.
प्रशासनाच्या या आक्रमक आणि नेटक्या नियोजनामुळे ग्रामीण भागातील नागरिकांचाही मोठा प्रतिसाद मिळत आहे. उर्वरित दिवसांत घरी येणाऱ्या बीएलओंना योग्य ती माहिती व कागदपत्रे देऊन या लोकशाहीच्या सक्षमीकरणाच्या मोहिमेत सहकार्य करावे, असे आवाहन महसूल प्रशासनाने केले आहे.



