Home » मुंबई » जावली-महाबळेश्वरच्या स्वाभिमानासाठी क्रांतीची मशाल पेटवा! — सत्ताधाऱ्यांच्या दहशतीविरोधात शशिकांत शिंदेंचा एल्गार

जावली-महाबळेश्वरच्या स्वाभिमानासाठी क्रांतीची मशाल पेटवा! — सत्ताधाऱ्यांच्या दहशतीविरोधात शशिकांत शिंदेंचा एल्गार

पांचगणी न्यूज नेटवर्क

​मुंबई : “इतिहास काळापासून जावलीचा इतिहास स्वाभिमानाचा राहिला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची पताका याच भूमीतून फडकवली होती. आज सत्तेचा गैरवापर करून जावली-महाबळेश्वरमध्ये दहशत निर्माण करण्याचा आणि नागरिकांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न सुरु आहे. मात्र, जावलीकरांच्या स्वाभिमानाला धक्का पोहोचला तर येथील जनता बंड पुकारते, हा इतिहास आहे. मला संपविण्याची भाषा करणाऱ्यांनी लक्षात ठेवावे, माझा जन्म संघर्षातून झाला आहे,” असा घणाघाती इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी दिला.

​नवी मुंबई येथील माथाडी भवन येथे जावली-महाबळेश्वर तालुक्यातील नवी मुंबई, ठाणे, पनवेल आणि मुंबई परिसर रहिवाशांच्या भव्य संवाद मेळाव्यात ते बोलत होते. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या ठरावावरून जावलीत सुरू झालेले राजकारण, तालुक्यातील वाढता तणाव आणि विरोधकांकडून होणाऱ्या चुकीच्या आरोपांवर शिंदे यांनी पहिल्यांदाच जाहीर भूमिका मांडत विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला.

​संघर्षाची भाषा कराल तर उत्तर नक्कीच मिळणार

उपस्थितांशी संवाद साधताना शशिकांत शिंदे म्हणाले, “जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या ठरावात सत्तेचा गैरवापर करून जावलीकरांना वेठीस धरण्याचे काम झाले. आम्ही प्रेमाने माणसे जोडतो; पण संघर्षाची भाषा कराल तर संघर्ष काय असतो हे दाखवून देऊ. आम्ही आजवर शांत होतो, पण पाण्याने डोक्यावरून जाण्याची वेळ आल्यावर गप्प बसणार नाही. केवळ खोटे गुन्हे दाखल करून आणि खोटी माहिती पसरवून जनतेची दिशाभूल करता येणार नाही; जनता योग्य वेळी धडा शिकवेल.”

​‘राजांचा’ आधार घेऊन राजकारण

आपल्या राजकीय प्रवासाची आठवण करून देताना शिंदे म्हणाले, “आदरणीय शरद पवार साहेबांनी उमेदवारी दिली आणि स्व. श्रीमंत छत्रपती अभयसिंहराजे भोसले यांच्या सहकार्यामुळे १९९९ मध्ये मी पहिल्यांदा विधानसभेत पोहोचलो. पुढे पवारांच्या आदेशाने कोरेगावमधून लढलो आणि जिंकलो. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि माझ्यामध्ये कोणतेही दुमत नाही. मात्र, ज्यांना माझ्याशी थेट सामना करता येत नाही, ते राजांचा आधार घेऊन बनाव करत आहेत. महु-हातगेघर धरणाला विरोध करणारेच आज आम्हाला प्रश्न विचारत आहेत, हा विरोधाभास आहे.”

​माथाडी कामगारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार

माथाडी कामगारांच्या प्रश्नांवर बोलताना ते म्हणाले, “शरद पवार आणि अण्णासाहेब पाटील यांनी ३० वर्षांपूर्वी माथाडी कामगारांना घरे मिळवून दिली. आज त्याच १२ हजार घरांना प्रशासनाने नोटीसा बजावल्या आहेत. मुक्त बाजारपेठेच्या धोरणामुळे माथाडी कामगार अडचणीत आला असून, प्रशासनाकडून निर्णय घेताना माथाडी प्रतिनिधींना विश्वासात घेतले जात नाही. माथाडींच्या हक्कासाठी मी खंबीरपणे पाठीशी उभा असून, गरज पडल्यास रस्त्यावर उतरून न्याय मिळवून देऊ.”

​जावलीच्या स्वाभिमानासाठी आता सर्वपक्षीय कार्यकर्ते एकत्र येत असून, आगामी काळात महाराष्ट्र पुन्हा आपल्या विचारांचा करायचा आहे. त्यासाठी आजपासूनच क्रांतीची मशाल पेटवून नव्या अध्यायाला सुरुवात करूया, अशी भावनिक सादही त्यांनी उपस्थितांना घातली.

​या मेळाव्यात ऋषिकान्त शिंदे यांनी माथाडी कामगारांच्या व्यथा मांडल्या. तसेच राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मंगेश आंमले, विठ्ठल गोळे, नामदेव मोरे, पांडा धोंडे, एस. के. पवार, अश्विनी बेलोशे, संतोष अहिरे, अजय इंगुळकर, मोहन पाडळे, नितीन घाडगे, जितू येवले आणि सुरेश शिंदे यांनी आपली मनोगते व्यक्त केली.

​प्रारंभी अण्णासाहेब पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी दोन्ही तालुक्यांच्या वतीने शशिकांत शिंदे यांचा नागरी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास जावलीचे माजी सभापती मोहनराव शिंदे, नगरसेवक सौरभ शिंदे, साहिलबाबा शिंदे, तालुकाध्यक्ष सचिन गोगावले, सुरेश पार्टे, अतिश कदम, गोपाळ बेलोशे, रामदास पार्टे यांच्यासह मुंबई, नवी मुंबई आणि वाशी परिसरातील जावली-महाबळेश्वरचे रहिवासी व माथाडी कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वागत व सूत्रसंचालन बबनराव संकपाळ यांनी केले.

Facebook
X
WhatsApp
Telegram

203K

Facebook Fans

103K

Followers

203K

Subscriber

113K

Followers