Home » सातारा » जिद्दीचा नवा इतिहास! साताऱ्याचे १०० टक्के अंध सुजित शिंदे बनले महाराष्ट्राचे पहिले अंध शिक्षणाधिकारी; वाचा प्रेरणादायी प्रवास

जिद्दीचा नवा इतिहास! साताऱ्याचे १०० टक्के अंध सुजित शिंदे बनले महाराष्ट्राचे पहिले अंध शिक्षणाधिकारी; वाचा प्रेरणादायी प्रवास

पांचगणी न्यूज नेटवर्क 

सातारा : “दृष्टी जरी हिरावली असली, तरी ध्येयाचा प्रकाश कुणीही हिरावू शकत नाही,” हे आपल्या असामान्य कर्तृत्वाने सिद्ध करत साताऱ्याचे सुजित रमाकांत शिंदे यांनी थेट शिक्षणाधिकारी (योजना) पदाला गवसणी घातली आहे. शंभर टक्के अंधत्व, गरिबीची झळ आणि परिस्थितीचा अथांग अंधार छेदत त्यांनी रचलेला हा इतिहास आज संपूर्ण महाराष्ट्रासाठी प्रचंड प्रेरणादायी ठरत आहे. सोमवारी त्यांनी सोलापूर जिल्हा परिषदेत आपल्या पदाची सूत्रे हाती घेतली असून, महाराष्ट्राचे पहिले १०० टक्के अंध शिक्षणाधिकारी ठरण्याचा बहुमान त्यांनी मिळवला आहे.

​सुजित शिंदे यांचा हा प्रवास अतिशय संघर्षमय आणि अंगावर काटा आणणारा आहे. मूळचे सातारा तालुक्यातील लिंब गावचे असलेले सुजित शहरालगतच्या वनवासवाडीत वास्तव्यास आहेत. वडील ट्रक चालक, तर आई गृहिणी. बालपणीच नियतीने दृष्टी हिरावून घेतली, परंतु साताऱ्यातील अण्णासाहेब कल्याणी विद्यालय आणि ‘सत्यशोध अंधसहयोग’ संस्थेने त्यांच्यात जिद्दीचे बीज रोवले. नेट-सेट सारख्या खडतर परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी तब्बल नऊ वर्षे भारतीय रेल्वेत आणि सात वर्षे युनियन बँकेत सहाय्यक व्यवस्थापक म्हणून सेवा बजावली. मात्र, उच्च पदस्थClass-1 अधिकारी बनण्याचे स्वप्न त्यांना शांत बसू देत नव्हते.

​एमपीएससीच्या परीक्षेत अंध प्रवर्गातून संपूर्ण राज्यात प्रथम क्रमांक पटकावून त्यांनी प्रशासकीय सेवेत प्रवेश केला. गेल्या वर्षभरात सातारा पंचायत समितीत परिविक्षाधीन गटशिक्षणाधिकारी म्हणून प्रभावी काम केल्यानंतर आता सोलापूरच्या शिक्षणाधिकारीपदी त्यांची वर्णी लागली आहे. या खडतर प्रवासात त्यांच्या पत्नी अश्विनी या त्यांची खरी ‘दृष्टी’ बनल्या. तासन् तास पुस्तके वाचून दाखवणे आणि त्यांचे ऑडिओ रेकॉर्डिंग तयार करून देणे, अशी साथ पत्नीने दिली. सुजित यांनी रात्रंदिवस हेच रेकॉर्डिंग ऐकून अभ्यासाचा डोंगर पार केला.

​”माझ्या डोळ्यांत प्रकाश नसला, तरी राज्यातील एकाही विद्यार्थ्याचे भविष्य अंधारात राहू देणार नाही,” असा ठाम विश्वास सुजित शिंदे यांनी व्यक्त केला आहे.

सोलापूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी त्यांचे स्वागत करत कार्यालयीन कामकाजासाठी कागदपत्रे वाचून दाखवणारे विशेष अत्याधुनिक मशीन पुरवण्याची ग्वाही दिली आहे. शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या सुजित शिंदे यांची ही यशोगाथा स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या प्रत्येक तरुणासाठी आणि प्रतिकूल परिस्थितीशी लढणाऱ्या प्रत्येक नागरिकासाठी प्रकाशाची नवी पहाट घेऊन आली आहे.

Facebook
X
WhatsApp
Telegram

203K

Facebook Fans

103K

Followers

203K

Subscriber

113K

Followers