Home » कराड » तब्बल 350 फुटी तिरंग्याने कराड झाले तिरंगामय

तब्बल 350 फुटी तिरंग्याने कराड झाले तिरंगामय

 

पांचगणी न्यूज नेटवर्क

कराड  : देशभक्तीच्या उत्साहाने भारलेल्या वातावरणात कराडमध्ये गुरुवारी भव्य तिरंगा रॅली उत्साहात पार पडली. रॅलीचे मुख्य आकर्षण ठरलेला तब्बल 350 फूट लांब तिरंगा ध्वज हजारो नागरिकांनी एकत्रितपणे हातात घेतला. ‌‘भारत माता की जय‌’, ‌‘वंदे मातरम्‌‍‌’च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. विशेष म्हणजे या तिरंगा रॅलीत सर्व जाती-धर्मांच्या नागरिकांनी एकजुटीने सहभागी होत राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन घडविले.

या तिरंगा रॅलीत कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले, आमदार मनोजदादा घोरपडे, माजी आमदार आनंदराव पाटील, मलकापूरचे नगराध्यक्ष तेजस सोनावले, प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे, तहसीलदार कल्पना ढवळे, उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील, यांच्यासह कराड मलकापूरचे नगरसेवक, नागरिक सहभागी झाले होते.

आमदार डॉ. अतुल भोसले म्हणाले, “महाराष्ट्रातील अत्यंत चांगली तिरंगा रॅली आज कराडमध्ये झाली आहे. या रॅलीच्या माध्यमातून कराडकरांनी देशाचे नाव मोठे करण्याचे काम केले आहे. विशेषतः तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग कौतुकास्पद आहे. देशाचे भवितव्य तरुणांच्या हातात असून, देशाला बलशाली आणि विकसित करण्याची जबाबदारीही त्यांच्यावर आहे.”

“1947 मध्ये देशाला स्वातंत्र्य मिळवून देणे हे आपले ध्येय होते. आता देशाच्या विकासाचे उद्दिष्ट आपल्या समोर आहे. विकसित भारताच्या निर्मितीसाठी तरुणांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. शिक्षण क्षेत्राला मोठे महत्त्व दिले जात असून वैद्यकीय शिक्षणाच्या जागाही वाढविण्यात आल्या आहेत. नवउद्योजकता आणि रोजगारनिर्मितीला चालना देण्याचे काम सुरू आहे. तरुणांनी शिक्षण, कौशल्य आणि नवकल्पनांच्या माध्यमातून देशाचे नाव मोठे करावे,” असे आवाहन डॉ. भोसले यांनी केले.

तिरंगा रॅलीच्या आयोजनात प्रशासनाने केलेल्या नियोजनाचेही त्यांनी कौतुक केले. “मोठ्या संख्येने नागरिकांना एकत्र आणून शिस्तबद्ध पद्धतीने रॅलीचे आयोजन करण्यात प्रशासनाने चांगले काम केले आहे. देशासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची ही संधी आहे. मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या सर्व नागरिकांचे मनापासून आभार,” असे ते म्हणाले.

आमदार मनोजदादा घोरपडे म्हणाले, “आजची भव्य तिरंगा रॅली प्रत्येकाच्या मनातील देशाविषयीची कृतज्ञता आणि प्रेम व्यक्त करणारी आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी क्रांतिकारक आणि स्वातंत्र्यसैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. त्यांच्या बलिदानाचे स्मरण करणे आणि त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणे ही आपली जबाबदारी आहे.”

“प्रत्येक नागरिकाने आपल्या घरावर तिरंगा फडकवून देशाप्रती असलेले प्रेम व्यक्त करावे. स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाची प्रेरणा पुढील पिढीपर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे. आजच्या तिरंगा रॅलीत सर्व जाती-धर्मांचे नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले, ही अभिमानाची बाब आहे,” असेही मनोज घोरपडे यांनी सांगितले.9

 

 

चौकट

350 फुटी तिरंगा ठरला आकर्षणाचा केंद्रबिंदू

तिरंगा रॅलीमध्ये तब्बल 350 फूट लांब तिरंगा ध्वज हे विशेष आकर्षण ठरले. हजारो नागरिकांनी हा भव्य तिरंगा हातात घेऊन रॅलीत सहभाग नोंदविला. लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत नागरिकांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. ‌‘भारत माता की जय‌’, ‌‘वंदे मातरम्‌’च्या घोषणांनी वातावरण देशभक्तीने भारून गेले होते. विविध जाती-धर्मांचे नागरिक एकत्र येऊन तिरंग्याला मानवंदना देत राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देत असल्याचे चित्र यावेळी पाहायला मिळाले.

Facebook
X
WhatsApp
Telegram

203K

Facebook Fans

103K

Followers

203K

Subscriber

113K

Followers