पांचगणी न्यूज नेटवर्क
मेढा : सततच्या मुसळधार पावसामुळे सुरक्षेचा उपाय म्हणून बंद करण्यात आलेला महाबळेश्वर-मेढा-सातारा रस्त्यावरील प्रसिद्ध केळघर घाट आता सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी पूर्ववत सुरू करण्यात आला आहे. घाट परिसरातील पावसाचा जोर ओसरल्याने आणि प्रत्यक्ष पाहणीनंतर हा मार्ग सुरक्षित असल्याचे स्पष्ट झाल्याने सार्वजनिक बांधकाम उपविभागाने हा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातील अधिकृत पत्र जावळी उपविभागाने तहसीलदारांना दिले आहे.
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे खबरदारीचा उपाय म्हणून २८ जुलैपासून केळघर घाटातील वाहतूक पूर्णपणे ठप्प ठेवण्यात आली होती. त्यानंतर १ ऑगस्ट रोजी सा.बां. विभागाच्या अधिकाऱ्यांनी संपूर्ण केळघर घाट परिसराची पाहणी केली. सद्यस्थितीत पाऊस कमी झाल्याने आणि रस्त्याची स्थिती सुधारल्याने आज, दि. २ ऑगस्टपासून हा घाट सर्व प्रकारच्या वाहनांसाठी वाहतूकयोग्य घोषित करण्यात आला आहे. यामुळे महाबळेश्वर, जावळी आणि सातारा परिसरातील नागरिक, प्रवासी व पर्यटकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
घाटातील वाहतूक सुरू झाली असली, तरी डोंगरमाथ्यावरून दरड किंवा दगड कोसळण्याची शक्यता अजूनही पूर्णपणे नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर सा.बां. विभागाने तातडीच्या आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी जेसीबी, डंपर आणि आवश्यक ती यंत्रणा घटनास्थळी सज्ज ठेवली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने प्रवासी, पर्यटक आणि एसटी बस चालकांनी केळघर घाट परिसरात कुठल्याही ठिकाणी वाहने न थांबवता सुरक्षितपणे प्रवास करावा, असे स्पष्ट आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. या निर्णयाची प्रत पोलीस प्रशासन, मेढा व सातारा आगार व्यवस्थापक आणि स्थानिक आपत्ती व्यवस्थापन समितीला पुढील आवश्यक कार्यवाहीसाठी पाठवण्यात आली आहे.



