Home » महाबळेश्वर » पश्चिम महाराष्ट्र-कोकण तीन भुयारी मार्गांनी जोडणार! : ‘मिसिंग लिंक’च्या धर्तीवर महत्त्वाकांक्षी प्रकल्प; उपमुख्यमंत्री शिंदेंची महाबळेश्वरात मोठी घोषणा

पश्चिम महाराष्ट्र-कोकण तीन भुयारी मार्गांनी जोडणार! : ‘मिसिंग लिंक’च्या धर्तीवर महत्त्वाकांक्षी प्रकल्प; उपमुख्यमंत्री शिंदेंची महाबळेश्वरात मोठी घोषणा

पांचगणी न्यूज नेटवर्क

महाबळेश्वर, ता. १४ (प्रतिनिधी) : पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील दळणवळण अधिक गतिमान करून पर्यटनाला नवी झळाळी देण्यासाठी मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’च्या धर्तीवर तीन भव्य भुयारी मार्ग उभारण्यात येणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाबळेश्वर येथे केली. या प्रकल्पांमध्ये कोकणातील पोलादपूर ते वाई तालुक्यातील जांभळी भुयारी मार्ग, खेड येथून रघुवीर घाट व कास पठाराखालून साताऱ्याला जोडणारा भुयारी मार्ग, तसेच पाचवड-मेढा नवीन महामार्ग आणि पुढे मेढा ते तापोळा भुयारी मार्गाचा समावेश आहे. या मार्गांमुळे घाटातील धोकादायक वळणे आणि प्रवासाचा वेळ वाचणार असून, महाबळेश्वरसह संपूर्ण सातारा जिल्ह्याच्या पर्यटन व व्यापाराला मोठी चालना मिळणार आहे.

​दिवाळीनिमित्त महाबळेश्वर दौऱ्यावर आलेल्या उपमुख्यमंत्री शिंदे यांची महाबळेश्वर तालुका मराठी पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन शहरातील प्रलंबित पर्यटन प्रकल्प, वाहतूक कोंडी आणि ग्रामीण भागातील मूलभूत सुविधांचे प्रश्न मांडले. त्यावर शिंदे यांनी पत्रकारांसमोरच संबंधित मंत्री व अधिकाऱ्यांना दूरध्वनी करून तातडीने कार्यवाहीच्या सूचना दिल्या. शहरातील पार्किंगचा प्रश्न सोडविण्यासाठी एसटी बसस्थानक परिसरात बहुमजली वाहनतळ उभारण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना तातडीने बैठक घेण्याचे निर्देश दिले, तर ग्रामीण प्रवाशांसाठी दहा मिनी बस उपलब्ध करून देण्याचेही स्पष्ट केले.

​याशिवाय, तापोळा परिसरातील दुर्गम वाड्या-वस्त्यांवरील रुग्णांना वेळेत वैद्यकीय मदत मिळावी यासाठी तातडीने जलरुग्णवाहिका सुरू करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी संतोष पाटील यांना देण्यात आल्या. स्थानिक तरुणांच्या हाताला काम मिळावे यासाठी तालुक्यात अद्ययावत कौशल्य विकास केंद्र सुरू करण्याबाबत मंत्री मंगलप्रभात लोढा यांना सांगण्यात आले. केळघर घाटातील काळा कडा ते मोळेश्वर रस्ता रुंदीकरण, सुरूर-पोलादपूर महामार्ग विकास, बहुउद्देशीय सभागृह आणि स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी निधी देण्याचे आश्वासन देत, जिल्हा परिषद सदस्य अजित संकपाळ व पंचायत समिती उपसभापती संजयराव मोरे यांनी मांडलेल्या दुर्गम भागातील विकासकामांसाठी शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही शिंदे यांनी दिली.

Facebook
X
WhatsApp
Telegram

203K

Facebook Fans

103K

Followers

203K

Subscriber

113K

Followers