पांचगणी न्यूज नेटवर्क
पाचगणी : स्थापनेपासूनच अत्यंत पारदर्शक, लोकाभिमुख आणि प्रामाणिक कारभाराच्या जोरावर पाचगणी येथील ‘श्री घाटजाई नागरी सहकारी पतसंस्थेने’ सभासद व ग्राहकांसोबत विश्वासाचे दृढ नाते निर्माण केले आहे. दिवसेंदिवस संस्थेच्या प्रगतीचा आलेख उंचावत असून, यामध्ये संचालक मंडळासह सर्व कर्मचारी आणी सभासद यांचे योगदान मोलाचे आहे. संस्थेत ठेवींचा वाढता ओघ हा सर्वसामान्य ग्राहकांचा संस्थेवरील विश्वास दर्शवितो. भविष्यातही ‘श्री घाटजाई पतसंस्था आणि विश्वास’ हे अतूट नाते असेच कायम राहील, असा ठाम विश्वास पतसंस्थेचे मार्गदर्शक व संस्थापक चेअरमन नानासाहेब कासुर्डे यांनी व्यक्त केला.
श्री घाटजाई नागरी सहकारी पतसंस्थेची २० वी वार्षिक सर्वसाधारण सभा अत्यंत उत्साही वातावरणात पार पडली. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना नानासाहेब कासुर्डे बोलत होते.
संस्थेच्या आर्थिक प्रगतीचा आलेख मांडताना त्यांनी सांगितले की, संस्थेने अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीतही कुशल व्यवस्थापनाच्या जोरावर २०२५-२६ या आर्थिक वर्षात २५ लाख ५९ हजार ५२० रुपयांचा निव्वळ नफा मिळवला आहे. या घवघवीत यशाचा थेट फायदा सभासदांना देताना यंदा १० टक्के लाभांश वाटप करण्यात येणार असल्याची खूशखबर त्यांनी दिली. तसेच, संस्थेचे भांडवल अधिक मजबूत करण्यासाठी सभासदांनी जास्तीत जास्त शेअर्स वाढवून घ्यावेत आणि पतसंस्थेच्या निरंतर भरभराटीसाठी सहकार्य करावे, असे आवाहनही कासुर्डे यांनी यावेळी केले.
सामाजिक बांधिलकीचा भाग म्हणून या वार्षिक सभेत ‘झाडे लावा, झाडे जगवा’ या पर्यावरणाभिमुख उपक्रमाचा संदेश उपस्थितांना देण्यात आला. या वृक्षसंगोपनाची विशेष जबाबदारी उपस्थितांनी स्वीकारली.
या वार्षिक सर्वसाधारण सभेस संस्थापक अध्यक्ष नानासाहेब कासुर्डे, व्हाईस चेअरमन रमेश खरात, संचालक तानाजी भिलारे, प्रतिभा कासुर्डे, किरण जानकर, विजय कासुर्डे, सूर्यकांत गोळे, अविनाश माने, दिलीप टेके, विजय कांबळे, सचिन वाडकर, स्वीकृत संचालिका वर्षा कासुर्डे, व्यवस्थापक विक्रम पोरे, फिरदोस शेख, विजय कासुर्डे, गोपाळ राजपुरे, दत्तात्रय कळंबे महाराज पतसंस्थेचे चेअरमन रविकांत बेलोशे, उद्योजक उल्हास कासुर्डे यांच्यासह पतसंस्थेचे इतर मान्यवर, कर्मचारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सभेच्या सुरुवातीला संस्थेचे व्यवस्थापक विक्रम पोरे यांनी सभेची नोटीस व विषयपत्रिकेचे वाचन केले. अहवाल वर्षातील कामकाजाला सभासदांनी टाळ्यांच्या गजरात मंजुरी दिली. कार्यक्रमाच्या शेवटी संचालक तानाजी भिलारे यांनी उपस्थितांचे आभार मानले.



