पांचगणी न्यूज नेटवर्क
सातारा : येथील नामांकित यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (वायसीआयएस) कॉलेजच्या मुलींच्या वसतिगृहात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना घडली आहे. हॉस्टेलमधील अपुऱ्या सुविधा आणि रेक्टरकडून होणाऱ्या त्रासाबाबत आवाज उठवणे एका १८ वर्षीय तरुण विद्यार्थिनीच्या जीवावर बेतले आहे. रेक्टर जयश्री जकाते आणि हॉस्टेल कमिटी सदस्यांनी पोलीस तक्रार करण्याची तसेच कॉलेजमधून काढून टाकण्याची धमकी देत मानसिक दबाव टाकल्याने, घाबरलेल्या या विद्यार्थिनीने वसतिगृहाच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण सातारा जिल्हा हादरला असून शैक्षणिक वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महाबळेश्वर तालुक्यातील ग्रामीण भागातील ही विद्यार्थिनी सायन्स कॉलेजमध्ये ‘फूड टेक्नॉलॉजी’च्या दुसऱ्या वर्षात शिकत होती. गेल्या वर्षापासून ती कॉलेजच्या लेडीज हॉस्टेलमध्ये राहत होती. वसतिगृहातील गैरसोयी आणि सध्याच्या रेक्टर जयश्री जकाते यांच्या वर्तनाबाबत तिने अनेकदा आपल्या पालकांकडे तक्रारी मांडल्या होत्या. घटनेच्या दिवशी वसतिगृहातील बाथरूममध्ये रेक्टरविरोधात एक पत्र चिकटवल्याच्या संशयावरून प्रशासन आणि विद्यार्थिनीमध्ये वाद झाला. यानंतर हॉस्टेल कमिटीच्या सदस्यांनी संबंधित मुलीला आणि तिच्या मैत्रिणीला पकडून, त्यांना कॉलेजमधून हाकलून देण्याची आणि पोलिसांत देण्याची धमकी दिली. एवढ्यावरच न थांबता कमिटीच्या सदस्यांनी जबरदस्तीने या मुलींचा जबानीचा व्हिडिओ शुट करून त्यांच्यावर तीव्र मानसिक दबाव निर्माण केला.
या सर्व अचानक उद्भवलेल्या प्रकारामुळे आणि कारवाईच्या भीतीमुळे दोन्ही विद्यार्थिनी कमालीच्या हादरल्या. प्रचंड मानसिक दबावातून सुटका मिळवण्यासाठी धावत जाऊन या विद्यार्थिनीने हॉस्टेलच्या तिसऱ्या मजल्यावरून थेट खाली उडी घेतली. तिच्यासोबत असलेल्या दुसऱ्या मैत्रिणीला इतर मुलींनी प्रसंगावधान राखून पकडल्यामुळे तिचा जीव वाचला. गंभीर जखमी झालेल्या विद्यार्थिनीला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. घटनेच्या वेळी आणि रुग्णालयात मृतदेह सोडून कॉलेज प्रशासन, रेक्टर जयश्री जकाते किंवा कमिटीचा एकही जबाबदार प्रतिनिधी तेथे उपस्थित नसल्याने पालकांमध्ये व नातेवाईकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
मृत मुलीने आत्महत्येपूर्वी इंग्रजीत एक ओळीची चिठ्ठी लिहून ठेवल्याचे समोर आले आहे. वसतिगृहातील गैरसोयींकडे आणि रेक्टरच्या त्रासाकडे कॉलेजचे प्राचार्य एस. टी. साळुंखे हे वेळोवेळी सातत्याने दुर्लक्ष करत होते, असा गंभीर आरोपही मुलीच्या वडिलांनी केला आहे. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात मुलीच्या पालकांनी दिलेल्या जबाबावरून लेडीज हॉस्टेलच्या रेक्टर जयश्री जकाते, कॉलेजचे प्राचार्य एस. टी. साळुंखे आणि हॉस्टेल कमिटीच्या सदस्यांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गंभीर गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून दोषींवर कडक कारवाईची मागणी सर्वस्तरातून होत आहे.



