पर्यावरणरक्षणासाठी प्रत्येकाने एक झाड दत्तक घेण्याचे डॉ. तेजस्विनी भिलारे यांचे आवाहन
पांचगणी न्यूज नेटवर्क /प्रमोद रांजणे
भिलार : भाऊ-बहिणीच्या पवित्र प्रेमाचा सण असलेला रक्षाबंधन केवळ मानवी नात्यांपुरता मर्यादित न ठेवता, निसर्गाशी असलेले नाते अधिक दृढ करण्याचा नवा पायंडा भिलार येथील हिलंरेज माध्यमिक विद्यालयाने पाडला आहे. विद्यालयातील विद्यार्थ्यांनी परिसर परिसरातील विविध वृक्षांना आकर्षक व पर्यावरणपूरक राख्या बांधून ‘वृक्ष वाचवा, पर्यावरण वाचवा’ असा हरित संदेश देत अनोख्या उत्साहात रक्षाबंधन साजरे केले.
हिलंरेज एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष नितीन भिलारे, सचिव जतीन भिलारे, संचालिका डॉ. तेजस्विनी भिलारे आणि मुख्याध्यापक मुकुंद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली या स्तुत्य उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी बोलताना अध्यक्ष नितीन भिलारे यांनी, वृक्ष हेही आपल्या कुटुंबाचाच अविभाज्य भाग आहेत ही भावना विद्यार्थ्यांमध्ये रुजवल्याबद्दल शाळेचे कौतुक केले. डॉ. तेजस्विनी भिलारे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, वृक्ष आपल्याला प्राणवायू, सावली आणि समृद्ध जीवन देतात; त्यामुळे वृक्षांचे रक्षण करणे म्हणजे आपल्या स्वतःच्या भविष्याचे रक्षण करणे होय. प्रत्येक विद्यार्थ्याने आजपासून किमान एका वृक्षाची निगा राखण्याचा संकल्प करावा, असे आवाहन त्यांनी केले.
मुख्याध्यापक मुकुंद शिंदे यांनी, विद्यार्थ्यांनी वृक्षाला मित्र मानून त्याची काळजी घेतल्यास हा छोटासा उपक्रम एका मोठ्या पर्यावरण चळवळीत रूपांतरित होईल असा विश्वास व्यक्त केला. या उपक्रमासाठी चित्रकला शिक्षक शांताराम जाधव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी प्लास्टिकचा वापर टाळून विविध रंग, कागद व निसर्गपूरक साहित्यापासून सुंदर राख्या तयार केल्या होत्या.
या पर्यावरणपूरक उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये निसर्गाविषयी आपुलकी आणि सामाजिक जबाबदारीची भावना अधिक दृढ झाली. या प्रसंगी संगीता खरात, सुजाता पारठे, नंदकुमार शिंदे, शांताराम जाधव, विनायक बगाडे, कल्पेश गायकवाड, राजू मोरे, संतोष मालुसरे, सौ. भगत एस. बी. यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



