पांचगणी न्यूज नेटवर्क
पांचगणी: सन १८८८ मध्ये स्थापन झालेल्या आणि तब्बल १३८ वर्षांची गौरवशाली शैक्षणिक परंपरा लाभलेल्या जावळी तालुक्यातील रांजणी येथील जिल्हा परिषद प्राथमिक आदर्श शाळेच्या नूतन भव्य इमारतीचा लोकार्पण सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी रांजणी, घोटेघर आणि वहागाव परिसरातील आजी-माजी विद्यार्थी व ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना जिल्हा परिषद सदस्य वसंतरावभाऊ मानकुमरे यांनी ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासाचा आराखडा मांडला. ते म्हणाले, “बदलत्या स्पर्धेच्या युगात आपली मुले मागे राहू नयेत, यासाठी त्यांना दर्जेदार शिक्षण मिळणे ही काळाची गरज आहे. आज खाजगी शाळांच्या तोडीस तोड शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळांमधून दिले जात आहे. शिक्षण क्षेत्रातील या क्रांतीसोबतच आपण दुर्गम डोंगरमाथ्यावरील गावांना रस्त्यांच्या माध्यमातून मुख्य प्रवाहाशी जोडत आहोत. याशिवाय, महाबळेश्वर-पाचगणी शेजारीच असलेल्या महू-हातगेघर धरण परिसरात ग्रामीण पर्यटनाला मोठी चालना दिली जाईल. येथे बोटिंग, हॉटेल्स आणि रेस्ट हाऊसच्या माध्यमातून स्थानिक बेरोजगार तरुणांसाठी रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत.”
यावेळी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक राजेंद्रशेठ राजपुरे यांनी शाळेच्या समृद्ध इतिहासाचा गौरव करत, शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी पालकांनीही जागरूक राहण्याचे आवाहन केले. तर माजी शिक्षण सभापती अमितदादा कदम यांनी महू धरण क्षेत्रातील आधुनिक शेती आणि पर्यटन विकासामुळे तरुणांचे शहरांकडे होणारे स्थलांतर थांबेल, असा विश्वास व्यक्त केला. माथाडी नेते अरुण रांजणे यांनी ग्रामस्थांच्या वतीने शाळेच्या विकासासाठी सदैव पाठीशी राहण्याची ग्वाही दिली.
या सोहळ्याला जिल्हा परिषद सदस्या जयश्रीताई गिरी, पंचायत समिती उपसभापती गोरखबाबा महाडिक, सदस्या शिल्पाताई शिंदे, चारुशिला पवार, गटशिक्षणाधिकारी संजय धुमाळ, भाजप तालुकाध्यक्ष संदीप परामणे, महिला अध्यक्ष मीनाक्षी बेलोशे, सरपंच मंदा रांजणे, उपसरपंच विठ्ठल रांजणे, माजी सरपंच संतोष रांजणे, भरत पवार, दत्ता सपकाळ, बाबुराव सपकाळ, रामचंद्र रांजणे, मुख्याध्यापक धुमाळ सर यांच्यासह विजय चोरट , संजय जंगम, राजेश रांजणे, सुधीर रांजणे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संतोष रांजणे यांनी केले. सूत्रसंचालन प्रमोद पवार व दत्तू सपकाळ यांनी केले, तर आभार अरुण रांजणे यांनी मानले. याप्रसंगी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंतांचा व सेवानिवृत्त शिक्षकांचा विशेष सत्कार करण्यात आला.



