Home » पांचगणी » स्मार्ट व्हिलेज पांगारी येथे जि. प. शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप उत्साहात! : तृप्ती देसाई यांची उपस्थिती

स्मार्ट व्हिलेज पांगारी येथे जि. प. शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप उत्साहात! : तृप्ती देसाई यांची उपस्थिती

पांचगणी न्यूज नेटवर्क

पाचगणी : पर्यटन आणि निसर्गरम्य वातावरणासाठी ओळखल्या जाणाऱ्या पाचगणी जवळील ‘स्मार्ट व्हिलेज’ पांगारी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सामाजिक बांधीलकी जपणारा एक विशेष उपक्रम पार पडला. सामाजिक न्यास (महाराष्ट्र राज्य), रोटरी क्लब ऑफ पाचगणी आणि मान्यवरांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील विद्यार्थ्यांसाठी विविध शैक्षणिक व इतर साहित्याचे वाटप करण्यात आले. अत्यंत उत्साहपूर्ण आणि भारावून टाकणाऱ्या वातावरणात हा सोहळा संपन्न झाला.

​कार्यक्रमाची सुरुवात पाहुण्यांचे पारंपारिक ढोल-झांज यांच्या गजर आणि निनादात दिमाखात स्वागत करून करण्यात आली. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करून कार्यक्रमाचा औपचारिक शुभारंभ झाला. या प्रसंगी सामाजिक न्यास (महाराष्ट्र राज्य) चे संस्थापक अध्यक्ष डॉ. सोन्या काशिनाथ पाटील, ‘भूमाता ब्रिगेड’च्या संस्थापक अध्यक्षा तृप्ती देसाई, बिग बॉस फेम ‘दादूस’ (संतोष चौधरी), रोटरी क्लब पाचगणीचे प्रेसिडेंट आदित्य गोळे, रोटेरियन सागर भोसले, संपादक किशोर पाटील, माजी सरपंच जाणू पांगारे, संदीप पांगारे, पोलीस पाटील दिनकर पांगारे, मनीषा पांगारे, ग्रामपंचायत सदस्या मंगल पांगारे, प्रिया पांगारे, शिक्षिका वनिता कदम, क्लार्क बाजीराव आंब्राळे, शिपाई संतोष पांगारे यांच्यासह आशा वर्कर पुष्पा पांगारे, अंगणवाडी सेविका प्रियांका पांगारे, मदतनीस प्रियांका पांगारे, नंदा पांगारे, बचत गटाच्या महिला, शालेय विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

​या सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना व शाळेला संगणक, म्युझिक सिस्टीम, स्टेशनरी व विविध शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणाची दारे उघडी व्हावीत आणि त्यांना तंत्रज्ञानाची गोडी लागावी, या उद्देशाने हे साहित्य देण्यात आले.

​कार्यक्रमा दरम्यान उपस्थितांना संबोधित करताना भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी महिला सक्षमीकरण आणि बालसंस्कारांवर मोलाचे मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या, “आजच्या आधुनिक युगात मुलांवर उत्तम संस्कार आणि दर्जेदार शिक्षण देणे ही काळाची गरज आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी स्वतःवर विश्वास ठेवून जिद्दीने पुढे गेले पाहिजे. महिलांनी आपल्या पाल्यांच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष देऊन त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी पाऊल उचलले पाहिजे. गाव जेव्हा एकसंध होऊन शाळेच्या पाठीशी उभे राहते, तेव्हाच खऱ्या अर्थाने गावचा आणि शाळेचा कायापालट होतो.” तृप्ती देसाई यांच्या या विचारप्रवर्तक भाषणाने उपस्थितांची मन जिंकली.

​यावेळी डॉ. सोन्या पाटील यांनी आपल्या मनोगतात, “मागच्या भेटीत दिलेला शब्द आज पूर्ण करताना आनंद होत आहे, यापुढेही पांगारी शाळेच्या प्रगतीसाठी व मुलांच्या शैक्षणिक गरजांसाठी लागेल ती सर्व मदत करू,” अशी ग्वाही दिली. रोटरी क्लबचे प्रेसिडेंट आदित्य गोळे यांनी रोटरी क्लबच्या माध्यमातून शाळेला वृक्ष संवर्धनासाठी झाडे आणि कलर प्रिंटर उपलब्ध करून दिल्याचे सांगत, सामाजिक कार्यात रोटरीचा सहभाग नेहमीच राहील असे स्पष्ट केले.

​कार्यक्रमात चिमुकल्या पार्थने अत्यंत प्रभावी भाषण करत उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. त्याच्या आत्मविश्वासाचे सर्व पाहुण्यांनी कौतुक केले. तर बिग बॉस फेम ‘दादूस’ यांनी आपल्या खास शैलीत लोकगीते आणि गाणी सादर करून कार्यक्रमात एक वेगळाच रंग भरला आणि वातावरण उल्हासित केले.

​कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन अध्यक्ष महेंद्र पांगारे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार जाणू पांगारे यांनी मानले. स्मार्ट व्हिलेज पांगारे ग्रामस्थांचे सहकार्य आणि मान्यवरांच्या दातृत्वामुळे हा शैक्षणिक उपक्रम अत्यंत यशस्वी व प्रेरणादायी ठरला.

Facebook
X
WhatsApp
Telegram

203K

Facebook Fans

103K

Followers

203K

Subscriber

113K

Followers