Home » पांचगणी » हर घर तिरंगा’ व ‘स्वच्छ पांचगणी’ अभियानांतर्गत बस स्टॉपवरील जनजागृती संदेशांचे 15 ऑगस्टला उद्घाटन; नगरपरिषद व हिलदारीचा संयुक्त उपक्रम

हर घर तिरंगा’ व ‘स्वच्छ पांचगणी’ अभियानांतर्गत बस स्टॉपवरील जनजागृती संदेशांचे 15 ऑगस्टला उद्घाटन; नगरपरिषद व हिलदारीचा संयुक्त उपक्रम

‘पांचगणी न्यूज नेटवर्क

​पांचगणी (प्रतिनिधी): पर्यटननगरी पांचगणीला अधिक स्वच्छ, सुंदर आणि पर्यावरणपूरक बनवण्यासाठी पांचगणी गिरीस्थान नगरपरिषद आणि ‘हिलदारी’ संस्थेच्या संयुक्त विद्यमाने “हर घर तिरंगा” अभियानाचे औचित्य साधून विशेष जनजागृती उपक्रम राबवण्यात येत आहे. या अभियानांतर्गत शहरातील प्रमुख बस स्टॉपवर स्वच्छता, कचरा व्यवस्थापन आणि निसर्ग संवर्धनाचा संदेश देणाऱ्या विशेष फलकांचे व चित्रांचे भव्य उद्घाटन आयोजित करण्यात आले आहे. या उपक्रमामुळे पर्यटननगरीच्या सौंदर्यात भर पडण्यासोबतच नागरिक व पर्यटकांमध्ये स्वच्छतेबाबत मोलाची जनजागृती होणार आहे.

​नवीन घनकचरा व्यवस्थापन नियम २०२६ ची प्रभावी अंमलबजावणी करणे, ओला व सुका कचरा वर्गीकरण, तसेच प्लास्टिकमुक्तीचा संदेश घराघरांत पोहोचवणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. या महत्त्वपूर्ण जनजागृती संदेशांच्या उद्घाटनाचा कार्यक्रम मा. नगराध्यक्ष दिलीपभाऊ बगाडे, मा. उपनगराध्यक्ष माधुरी कासुर्डे, नगरपरिषदेचे मा. मुख्याधिकारी पंडित पाटील तसेच सर्व सन्माननीय नगरसेवकांच्या प्रमुख उपस्थितीत व शुभहस्ते संपन्न होणार आहे.

​पाचगणी हे देशभरातील पर्यटकांचे आवडते केंद्र असल्याने या ठिकाणी स्वच्छता टिकवून ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. नगरपरिषद आणि हिलदारी संस्था गेल्या अनेक वर्षांपासून शहरातील कचरा व्यवस्थापन आणि पर्यावरण संवर्धनासाठी सातत्याने कार्यरत आहेत. “हर घर तिरंगा” अभियानासोबतच स्वच्छतेचा हा नवा अध्याय शहराच्या वैभवात भर घालणारा ठरणार आहे. या उपक्रमाला नागरिकांनी आणि पर्यटकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन स्वच्छ पांचगणीच्या संकल्पात आपले योगदान द्यावे, असे आवाहन नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

Facebook
X
WhatsApp
Telegram

203K

Facebook Fans

103K

Followers

203K

Subscriber

113K

Followers