Home » सातारा » सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या जिल्हाध्यक्षपदी नामदेवराव पाटील (आप्पा) यांचा पदग्रहण सोहळा उत्साहात; संघटन बळकटीचा निर्धार

सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या जिल्हाध्यक्षपदी नामदेवराव पाटील (आप्पा) यांचा पदग्रहण सोहळा उत्साहात; संघटन बळकटीचा निर्धार

पांचगणी न्यूज नेटवर्क

सातारा : सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष नामदेवराव पाटील (आप्पा) यांचा पदग्रहण व सत्कार सोहळा हजारो कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (बाबा) यांच्या हस्ते नामदेवराव पाटील यांनी जिल्हाध्यक्षपदाचा अधिकृत पदभार स्वीकारला.

​यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सांगितले की, देश आज महागाई, बेरोजगारी आणि शेतकरी प्रश्नांसारख्या गंभीर आव्हानांना तोंड देत आहे. अशा काळात काँग्रेसची संघटना अधिक सक्षम करणे ही प्रत्येक कार्यकर्त्याची जबाबदारी आहे. सातारा जिल्ह्याला काँग्रेसचा मोठा ऐतिहासिक वारसा असून नामदेवराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील संघटना प्रत्येक गावागावात अधिक मजबूत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

​महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते हणमंत पवार यांनी आपल्या भाषणात राज्य व केंद्र सरकारच्या धोरणांवर कडक शब्दांत टीका केली. राज्यातील महिलांवरील वाढते अत्याचार, महागाई आणि बेरोजगारी या मुद्द्यांवर सरकार पूर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोप त्यांनी केला. तर युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे यांनी जिल्ह्यातील काँग्रेसच्या ऐतिहासिक ताकदीचा उल्लेख करत, नव्या पिढीला पक्षाशी जोडून सातारा काँग्रेस पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास व्यक्त केला.

​नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष नामदेवराव पाटील (आप्पा) यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले की, पक्षाने माझ्यावर टाकलेला विश्वास मी कामातून सार्थ ठरवेन. आदरणीय पृथ्वीराज चव्हाण बाबांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील प्रत्येक कार्यकर्त्याला सोबत घेऊन पक्ष अधिक बळकट करणे हेच माझे मुख्य ध्येय राहील.

​या सोहळ्यादरम्यान काँग्रेसच्या ओबीसी विभागाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल भानुदास माळी आणि जिल्ह्यातील काँग्रेसच्या एकमेव जिल्हा परिषद सदस्या सौ. सुनंदा पाटील यांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.

​या कार्यक्रमाला माजी जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे, हनमंत पवार, अजितराव पाटील, राजेंद्र शेलार, रणजितसिंह देशमुख, महिला जिल्हाध्यक्षा सुषमा राजेघोरपडे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील पदाधिकारी, माजी लोकप्रतिनिधी आणि महिला, युवक काँग्रेस, एनएसयूआय व सेवा दलाचे हजारो कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. अजितराव पाटील यांनी प्रास्ताविक केले, तर धैर्यशील सुपले यांनी सूत्रसंचालन केले.

Facebook
X
WhatsApp
Telegram

203K

Facebook Fans

103K

Followers

203K

Subscriber

113K

Followers