पांचगणी न्यूज नेटवर्क
करहर : जावली तालुक्यातील दुष्काळी आणि सिंचनापासून वंचित असलेल्या हातगेघर परिसरासाठी अत्यंत आनंदाची आणि ऐतिहासिक बातमी आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या हातगेघर उपसा सिंचन योजनेला अखेर राज्य शासनाने तत्त्वतः मान्यता दिली आहे. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या समवेत मंत्रालयात घेतलेल्या विशेष बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे हातगेघर आणि परिसरातील सुमारे २२७ हेक्टर सिंचनापासून वंचित राहिलेल्या शेतजमिनीला शाश्वत पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
जावली आणि महाबळेश्वर तालुक्याचा दुर्गम भाग हा भौगोलिकदृष्ट्या डोंगराळ असल्याने येथे पाऊस भरपूर होऊनही उन्हाळ्यात पाणी टंचाईला सामोरे जावे लागते. या पार्श्वभूमीवर, कुडाळी प्रकल्पातील बंदिस्त नलिका वितरण प्रणालीमुळे (पाइपलाईन) होणाऱ्या पाण्याच्या बचतीचा योग्य वापर करून हातगेघर परिसरातील अतिरिक्त क्षेत्राला सिंचनाचा लाभ देणे तांत्रिकदृष्ट्या शक्य असल्याचा अहवाल बैठकीत सादर करण्यात आला. जलसंपदा विभागाने या प्रस्तावाला हिरवा कंदील दाखवला असून, आता या योजनेचे सर्वेक्षण, संकल्पना आराखडा आणि अंतिम अंदाजपत्रक (एस्टीमेट) तयार करण्याची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
याच उच्चस्तरीय बैठकीत सातारा तालुक्यातील लिंब येथील कातकरी वस्तीला जोडणाऱ्या रस्त्यासाठी धोम उजव्या कालव्यालगत आवश्यक असणारी परवानगी जलसंपदा विभागाकडून तात्काळ देण्यात आली. केंद्र सरकारच्या ‘प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान’ (PM-JANMAN) अंतर्गत पद्मावती मंदिर ते कातकरी वस्ती असा हा हक्काचा रस्ता प्रस्तावित आहे. या मंजुरीमुळे अनेक वर्षांपासून उपेक्षित राहिलेल्या आदिवासी बांधवांना आता सुरक्षित आणि बारमाही दळणवळणाची सुविधा उपलब्ध होणार आहे.
आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सातारा जिल्ह्यातील प्रलंबित सिंचन योजना, पायाभूत सुविधा आणि आदिवासी घटकांच्या विकासाला प्राधान्य देत, संबंधित अधिकाऱ्यांनी लालफितीचा कारभार बाजूला ठेवून ही कामे विहित मुदतीत पूर्ण करावीत, अशा कडक सूचना यावेळी दिल्या. हातगेघर योजनेच्या या मंजुरीमुळे जावलीच्या पश्चिमेकडील भागात शेती विकासाला मोठी गती मिळणार असून, शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.
”हातगेघर उपसा सिंचन योजनेला तत्त्वतः मान्यता मिळाल्याने परिसरातील शेतकऱ्यांना खूप मोठा दिलासा मिळाला आहे. आमदार नामदार शिवेंद्रसिंहराजे (बाबाराजे) भोसले यांनी निवडणुकीत आणि विविध जाहीर सभांमध्ये दिलेला शब्द आज प्रत्यक्ष कृतीत आणून पाळला आहे. या निर्णयामुळे २२७ हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळण्याचा मार्ग सुकर झाला असून, लवकरच योजनेच्या प्रत्यक्ष सर्वेक्षणाला सुरुवात होईल. जावलीच्या सुजलाम् सुफलाम् ध्येयासाठी घेतलेल्या या निर्णयाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील आणि सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांचे आम्ही जावलीकरांच्या वतीने मनःपूर्वक आभार मानतो.”
– श्रीहरी गोळे (माजी मंडलाध्यक्ष, भाजप, जावळी तालुका)



