पांचगणी न्यूज नेटवर्क
पाचगणी, ता. 5 : शिक्षण क्षेत्रात अत्यंत निष्ठेने आणि अभ्यासपूर्ण पद्धतीने उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सातारा जिल्ह्यातील गणेशपेठ, रुईघर येथील प्रयोगशील शिक्षक सिकंदर बेलोशे यांना ‘इंडियन टीचर्स फोरम’चा मानाचा ‘राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार – २०२६’ जाहीर झाला आहे. कोल्हापूर येथील ऐतिहासिक राजर्षी शाहू स्मारक भवन येथे आयोजित भव्य पुरस्कार वितरण सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्यांच्या या उत्तुंग यशामुळे सातारा आणि परिसरातील शैक्षणिक वर्तुळातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, नावीन्यपूर्ण अध्यापन पद्धतींचा वापर आणि सामाजिक बांधिलकी जपत शिक्षण क्षेत्रात मोलाचे योगदान दिल्याबद्दल ‘इंडियन टीचर्स फोरम’तर्फे सिकंदर बेलोशे यांची या राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. आज कोल्हापुरातील राजर्षी शाहू स्मारक भवन येथे अत्यंत उत्साहात हा सोहळा पार पडला.
या सोहळ्यास इंडियन टीचर्स फोरमचे अध्यक्ष डॉ. डी. श्रीकांत आणि संस्थेचे पदाधिकारी ठाणेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून हिंदुराव हुजरे-पाटील, अनिल महामाने, डॉ. श्रीपाद देसाई, सुरेश केसरकर आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांच्या हस्ते श्री. बेलोशे यांना सन्मानचिन्ह, सन्मानपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.
आपल्या ज्ञानदानाची परंपरा जपत गुणवत्तेचा दर्जा उंचावण्यासाठी बेलोशे सर यांनी सातत्याने विविध उपक्रम राबवले आहेत. केवळ पुस्तकी ज्ञानापुरते मर्यादित न राहता विद्यार्थ्यांमध्ये नैतिक मूल्ये रुजवणे आणि त्यांना स्पर्धा परीक्षेसह जगण्याच्या प्रवासासाठी सक्षम बनवण्यात त्यांचा मोठा वाटा राहिला आहे. त्यांच्या या राष्ट्रीय सन्मानामुळे सातारा जिल्ह्याच्या शैक्षणिक शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर सिकंदर बेलोशे यांच्यावर शिक्षण, सामाजिक, राजकीय आणि प्रशासकीय क्षेत्रातील मान्यवरांसह त्यांच्या हितचिंतकांकडून व सहकाऱ्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.



