पांचगणी न्यूज नेटवर्क
वाई : बावधन, कणूर, देरेवाडी, अनपटवाडी, म्हातेकरवाडी, वाघजाईवाडी, पांढरेचीवाडी व परिसरातील महिला ग्रामस्थांनी प्रस्तावित खाण व क्रशर प्रकल्पाला तीव्र विरोध दर्शवित वाई तहसीलदारांकडे निवेदन सादर केले. या प्रकल्पामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेसह शेती, पाणी व पर्यावरणावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता असल्याने ग्रामस्थांची सविस्तर सुनावणी घेऊनच पुढील कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
परिसरातील रस्ते अनेक ठिकाणी अरुंद असून, प्रस्तावित प्रकल्पामुळे अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणात वाहतूक वाढण्याची शक्यता आहे. धनगरवाडा, नदीचा स्टॉप, एस. टी. स्टँड तसेच दोन शाळांच्या परिसरातून नागरिक व लहान मुलांची सतत ये-जा असते. त्यामुळे अवजड वाहनांच्या वाढत्या वाहतुकीमुळे अपघाताचा धोका वाढण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
यापूर्वीही अवजड वाहनाच्या अपघातात एका कुटुंबाने आपला आधारवड गमावल्याची घटना घडल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी प्रकल्पाला परवानगी देण्यापूर्वी वाहतूक सुरक्षेचा स्वतंत्रपणे व गांभीर्याने विचार करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
खाण व क्रशर प्रकल्पामुळे निर्माण होणारी धूळ, प्रदूषण, पाण्याचा प्रश्न, शेतीवरील संभाव्य परिणाम तसेच पर्यावरणाची हानी याकडेही ग्रामस्थांनी प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. विशेषतः महिला ग्रामस्थांनी मुलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ठामपणे मांडला. शाळेत गेलेली मुले सुखरूप घरी परत येईपर्यंत पालकांच्या मनात चिंता कायम राहणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
“काही व्यक्तींना रोजगार मिळू शकतो; मात्र त्यासाठी गावाची सुरक्षितता, शेती, पाणी आणि पर्यावरणाची किंमत मोजणे योग्य नाही,” अशी ठाम भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे.
प्रस्तावित खाण व क्रशर प्रकल्पासंदर्भात सर्व ग्रामस्थांची सविस्तर सुनावणी घ्यावी. प्रकल्पामुळे वाहतूक, धूळ, प्रदूषण, पाणी, शेती व पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांचा सखोल आढावा घ्यावा. तसेच शाळा, एस. टी. स्टँड, वस्ती आणि अरुंद रस्त्यांच्या सुरक्षेचा स्वतंत्र विचार करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
सर्व शासकीय परवानग्या, पर्यावरणीय अटी व वाहतूक सुरक्षेच्या निकषांची प्रत्यक्ष पाहणी करूनच पुढील कार्यवाही करावी. ग्रामस्थांच्या हरकतींचा विचार होईपर्यंत प्रकल्पासंदर्भातील पुढील कार्यवाही स्थगित ठेवावी, अशीही मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
“आम्ही कोणत्याही व्यक्तीविरोधात नसून गावाच्या सुरक्षित भविष्यासाठी आणि मुलांच्या संरक्षणासाठी शांततामय व लोकशाही मार्गाने लढा देत आहोत,” असे ग्रामस्थांनी यावेळी स्पष्ट केले.



