पांचगणी न्यूज नेटवर्क
पाटण : कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने छ. शिवाजी महाराज कोयना जलाशयात येणार्या पाण्याची आवकही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. धरणात सध्याच्या घडीला 87.83 (83.45 टक्के) टीएमसी पाणीसाठा झाला. यापुढे केवळ 17.42 टीएमसी पाणी साठवण क्षमता आणि सध्या प्रतिसेकंद सरासरी 59 हजार 194 क्युसेक्स पाण्याची आवक लक्षात घेता पाणीसाठा नियंत्रित करण्यासाठी शुक्रवारी संध्याकाळी धरणाचे सहा वक्री दरवाजे दोन फूट व नंतर रात्री 10 वाजता 3 फूटांवर उचलून त्यातून 16 हजार 535 व धरणाच्या पायथा वीजगृहातील एका जनित्राद्वारे वीजनिर्मिती करून 1 हजार 50 असे एकूण 17 हजार 585 क्युसेक्स पाणी पूर्वेकडे कोयना नदीपात्रात सोडण्यात आले आहे.
दरम्यान, रात्री उशिरा कोयना नदीवरील मुळगाव पूल पाण्याखाली गेल्याने पलिकडील गावांशी संपर्क तुटला आहे. धरणातून सोडलेल्या पाण्यासह पूर्वेकडे कोयना नदीपात्रात पडणारा पाऊस यामुळे कोयना नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणावर धोकादायक वाढ झाल्याने नदीकाठची गावं, लोकवस्त्यांना प्रशासनाकडून सावधानतेचा इशारा देण्यात आलेला आहे. धरणात ज्या पटीत पाण्याची आवक वाढेल त्यानूसार पूर्वेकडे पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येईल, अशी माहिती कोयना सिंचन विभागाकडून देण्यात आली आहे.
कोयना धरणांतर्गत कोयना, नवजा, महाबळेश्वर अंतर्गत छोट्या नद्या, नाले, ओढे, धबधबे यातून सध्या प्रतिसेकंद सरासरी 59, हजार 94 क्युसेक्स पाण्याची आवक सुरू आहे. धरणात सध्या उपलब्ध 87.83 टीएमसी तर उपयुक्त 82.71 टीएमसी पाणीसाठा आहे. गुरुवार संध्याकाळी पाच ते शुक्रवार संध्याकाळी पाच या चोवीस तासात व 1 जूनपासून आत्तापर्यंतचा पाऊस कोयना 191 (2981) मिलिमीटर, नवजा 268 (3620) मिलिमीटर, महाबळेश्वर 341 (3826) मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. या चोवीस तासांत धरणात तब्बल 3.06 टीएमसी पाण्याची आवक झाली आहे. 105.25 टीएमसी पाणी साठवण क्षमता असलेले हे धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी आता केवळ 17.42 टीएमसी पाण्याची गरज आहे. सध्या धरण 83.45 टक्के भरले आहे. पाणलोट क्षेत्रातील पावसाचा जोर कायम राहिल्यास आणि धरणात येणारी आवक वाढल्यास सांडव्यावरील विसर्गात आणखी वाढ केली जाऊ शकते, असे आवाहन कोयना सिंचन विभागाकडून करण्यात आले आहे.
दरम्यान, कोयना धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आल्याने संगमनगर (धक्का) येथील जुना पूल पाण्याखाली गेला आहे. तर पाटण शहरानजीकचा कोयना नदीवरील मुळगाव पूल रात्री उशिरा पाण्याखाली गेल्याने नदीच्या पलिकडील गावांचा संपर्क तुटला आहे. निसरे बंधाराही उशिरा पाण्याखाली गेला आहे.
नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे : तहसीलदार अनंत गुरव
छत्रपती शिवाजी महाराज कोयना शिवसागर जलाशयातून सध्या 17 हजार 585 क्युसेक्स पाणी कोयना नदीपात्रात सोडण्यात येत आहे. त्यामुळे नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली असून कोयना नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी नदीपात्रात जाणे टाळावे. जनावरे, वाहने तसेच शेतीची कामे करताना विशेष खबरदारी घ्यावी. पावसाचा जोर कायम राहिल्यास धरणातून विसर्ग वाढविण्यात येऊ शकतो. त्यामुळे ग्रामस्थांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे.



