Home » पांचगणी » गोडवलीत पावसाच्या तांडवाने शेतजमीन पुन्हा खचली; तपनेश्वर मंदिराशेजारील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

गोडवलीत पावसाच्या तांडवाने शेतजमीन पुन्हा खचली; तपनेश्वर मंदिराशेजारील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

पांचगणी न्यूज नेटवर्क

​पाचगणी : पाचगणी आणि परिसरात गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या धुवाधार आणि मुसळधार पावसाने पुन्हा एकदा उग्र रूप धारण केले आहे. या संततधार पावसामुळे पाचगणी शहराच्या अगदी जवळच असलेल्या आणि नरवीर तानाजी मालुसरे यांची ऐतिहासिक जन्मभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोडवली (ता. महाबळेश्वर) येथे पुन्हा एकदा भूस्खलनाचा प्रकार घडला आहे.

 

गावातील प्रसिद्ध तपनेश्वर मंदिरालगत असलेली शेतजमीन अचानक मोठ्या प्रमाणात खचल्याने जमिनीत सुमारे १०० फूट लांबीच्या आणि तीन ते चार फूट खोल भयावह भेगा पडल्या आहेत. कालपासून पावसाने अचानक जोर धरल्यामुळे ही संकटमय घटना घडली असून यामुळे संपूर्ण परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

​गोडवली गाव हे निसर्गरम्य टेबल लँडच्या पायथ्याशी वसलेले आहे. या भौगोलिक रचनेमुळे येथे पाऊस तीव्र असतो. मात्र, याच तपनेश्वर मंदिरालगतच्या जमिनीवर भूस्खलन होण्याची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या १२ ते 13 वर्षांपूर्वीही याच ठिकाणी अशाच प्रकारे जमीन मोठ्या प्रमाणात खचली होती. त्यानंतरही दोन ते तीन वेळा याच भागाला भूस्खलनाचा फटका बसला आहे. परंतु, प्रत्येक वेळी दुर्घटना घडल्यानंतर जिल्हा प्रशासन आणि संबंधित विभाग केवळ औपचारिक पाहणी करून विषय संपवतो , असा संतप्त आरोप स्थानिक ग्रामस्थ करत आहेत.

 

भूवैज्ञानिकांना (जिऑलॉजिस्ट) घटनास्थळी पाचारण करून या माती खचण्यामागचे ठोस शास्त्रीय कारण शोधणे आणि त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करणे गरजेचे होते. दुर्दैवाने, गेल्या दीड दशकात प्रशासनाकडून केवळ कागदी सोपस्कार आणि निष्फळ पाहणी दौऱ्यांशिवाय कोणतीही ठोस उपाययोजना झालेली नाही.

​प्रशासनाच्या याच उदासीन आणि निष्काळजी कारभारामुळे आज गोडवलीतील स्थानिक शेतकरी सतीश रघुनाथ गुरव यांच्या शेतीचे अपरिमित नुकसान झाले आहे. सुपीक शेतजमीन डोळ्यांदेखत खचून गेल्याने आणि संपूर्ण शेतात भीतीदायक दऱ्यांसारख्या भेगा पडल्याने त्यांच्यावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास उरलेली शेतीही या भूस्खलनाच्या भक्ष्यस्थानी पडते की काय, अशा उद्विग्न आणि भीतीदायक छायेत जमीन मालक व ग्रामस्थ वावरत आहेत. दरवेळी फक्त पाहणीचे नाटक करणाऱ्या प्रशासनाने आता तरी झोपेतून जागे व्हावे, तातडीने तज्ज्ञ भूवैज्ञानिकांची टीम पाठवून या भूस्खलनावर कायमस्वरूपी उपाययोजना करावी आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्याला त्वरित भरपाई द्यावी, अशी जोरदार मागणी होत आहे.

Facebook
X
WhatsApp
Telegram

203K

Facebook Fans

103K

Followers

203K

Subscriber

113K

Followers