पांचगणी न्यूज नेटवर्क
वाई : धोम धरणा क्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे धरणातील पाणीसाठा १२.१७ टीएमसी (९०.११ टक्के) इतका झाला आहे. धरणात येणाऱ्या पाण्याचा वेग वाढल्याने पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी आज सायंकाळी ६ वाजल्यापासून धरणाच्या सांडव्यामधून ६,३३५ क्युसेक विसर्ग कृष्णा नदीपात्रात सुरू करण्यात आला होता. मात्र धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी आज ३१ जुलै २०२६ रोजी रात्री १० वाजता धोम धरणाच्या सांडव्यामधून ७८४७ क्युसेक विसर्ग सोडण्यात येत आहे.
धरणातून सुरू झालेल्या विसर्गामुळे कृष्णा नदी दुथडी भरून वाहत असून वाई शहरातील नदीकाठच्या परिसरात पाणी झपाट्याने वाढत आहे. वाढत्या पाणीपातळीमुळे वाईतील सुप्रसिद्ध श्री महागणपती मंदिरात पुराचे पाणी शिरले असून, मंदिर परिसर भाविकांसाठी बंद करण्यात आला आहे. मंदिराशेजारी असणाऱ्या पूजा साहित्य आणि प्रसादाच्या व्यावसायिकांनी महापुराच्या धास्तीने आपापली दुकाने स्थलांतरित केली आहेत. तसेच मंदिरामागील ऐतिहासिक नाणी पूल पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे.
दरम्यान, पुराचे पाणी पाहण्यासाठी महागणपती पुलावर नागरिकांनी मोठी गर्दी केली असून, प्रशासनाने अनावश्यक गर्दी टाळण्याचे आणि सुरक्षित अंतर राखण्याचे आवाहन केले आहे.
सातारा सिंचन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पावसाच्या प्रमाणानुसार आणि धरणात येणाऱ्या पाण्याच्या वाढत्या येव्यानुसार विसर्गात आवश्यकतेनुसार वाढ किंवा घट केली जाऊ शकते. त्यामुळे कृष्णा नदीकाठच्या सर्व गावांतील नागरिकांनी सतर्क राहावे, नदीपात्रात उतरू नये तसेच नदीकाठच्या परिसरात जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
ग्रामपंचायत प्रशासन, महसूल विभाग, पोलीस यंत्रणा आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाने नदीकाठच्या गावांमध्ये आवश्यक ती खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या असून, नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करून स्वतःची आणि कुटुंबीयांची सुरक्षितता जपावी, असे आवाहन करण्यात आले आहे.



