पाचगणी न्यूज नेटवर्क
पांचगणी : जागतिक कीर्तीचे पर्यटन स्थळ असलेल्या पाचगणीच्या टेबललँडवर मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार दरवर्षीप्रमाणे यंदाही १३ जून ते २३ सप्टेंबर या कालावधीत घोडे आणि घोडागाडीच्या प्रवेशावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. पाचगणी गिरिस्थान नगरपरिषदेने या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी सुरू केली असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर टेबललँडच्या संरक्षणासाठी आणि पर्यटकांच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, काही घोडा व घोडागाडी चालकांकडून या आदेशाचे वारंवार उल्लंघन होत असल्याचे नगरपरिषद प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने आता अत्यंत कडक भूमिका घेतली असून आदेश झुगारून व्यवसाय करणाऱ्यांविरुद्ध थेट पाचगणी पोलीस ठाण्यात न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला जाणार आहे.
या मोहिमेसाठी नगरपरिषदेने आपत्ती व्यवस्थापन, वृक्ष विभाग, बांधकाम विभाग व इतर कर्मचाऱ्यांची विशेष नियुक्ती केली आहे. या बंदोबस्तात किंवा अंमलबजावणीत कोणतीही हलगर्जीपणा चालणार नाही, असे स्पष्ट करत कामात कसूर करणाऱ्या कर्मचाऱ्यांवरही महाराष्ट्र नागरी सेवा नियमांनुसार शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा मुख्याधिकारी पंडित पाटील यांनी दिला आहे. त्यामुळे यंदा प्रशासनाने घोडे व्यावसायिक आणि निष्काळजी कर्मचाऱ्यांना एकाच वेळी कडक इशारा दिल्याने टेबललँडवर प्रशासकीय यंत्रणा ॲक्शन मोडमध्ये आली आहे.
…तर थेट पोलीस कारवाई: सपोनि दिलीप पवार
”मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाचे सर्वांनी काटेकोर पालन करणे बंधनकारक आहे. नगरपरिषदेने निश्चित केलेल्या १३ जून ते २३ सप्टेंबर या बंदीच्या कालावधीत जर कोणीही टेबललँडवर घोडे किंवा घोडागाडी घेऊन व्यवसाय करताना आढळल्यास, अथवा नियमांचे उल्लंघन करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर पाचगणी पोलीस ठाण्यात तात्काळ गुन्हे दाखल केले जातील. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांची गय केली जाणार नाही.”
— दिलीप पवार (सहाय्यक पोलीस निरीक्षक, पाचगणी पोलीस ठाणे)



