Home » जावळी » जावलीच्या कन्येचा नवी मुंबईत डंका! अश्विनी बेलोशे यांची राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या (शरदचंद्र पवार) नवी मुंबई कार्याध्यक्षपदी निवड

जावलीच्या कन्येचा नवी मुंबईत डंका! अश्विनी बेलोशे यांची राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या (शरदचंद्र पवार) नवी मुंबई कार्याध्यक्षपदी निवड

पांचगणी न्यूज नेटवर्क 

काटवली : जावली तालुक्यातील काटवली या छोट्याशा गावच्या सुकन्या सौ. अश्विनी सुयोग बेलोशे यांची राष्ट्रवादी महिला काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या ‘नवी मुंबई कार्याध्यक्षा’पदी निवड करण्यात आली आहे. पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा अॅड. रोहिणी एकनाथराव खडसे यांनी अधिकृत नियुक्ती पत्र देऊन त्यांच्या खांद्यावर ही नवी जबाबदारी सोपवली. मुंबई व नवी मुंबई परिसरातील त्यांच्या उल्लेखनीय सामाजिक कार्याची आणि पक्षनिष्ठेची दखल घेत पक्षाने त्यांना ही मोठी जबाबदारी देऊन एकप्रकारे त्यांच्या कामाची पोचपावतीच दिली आहे.

​मूळच्या जावली तालुक्यातील काटवली गावच्या असलेल्या अश्विनी बेलोशे या गेल्या अनेक वर्षांपासून कोपरखैरणे व नवी मुंबई परिसरात सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सातत्याने कार्यरत आहेत. त्यांचे पती सुयोग बेलोशे हेदेखील मुंबईत पक्षाचे काम अत्यंत जोमाने करत असून, अश्विनी या त्यांच्या खांद्याला खांदा लावून पक्षसंघटनेच्या वाढीसाठी आणि सामाजिक उपक्रमांत हिरीरीने सहभागी होत असतात. नुकतीच त्यांनी महानगरपालिका निवडणूक पूर्ण ताकदीने लढवली होती. या निवडणुकीत काही कारणास्तव अपयश आले, तरीही खचून न जाता अत्यंत जिद्दीने व आत्मविश्वासाने त्या पुन्हा जनसेवेत आणि पक्षाच्या कामात सक्रिय झाल्या. त्यांच्या याच चिकाटीची, जिद्दीची आणि सामाजिक कार्याची दखल वरिष्ठ नेतृत्वाने घेतली आहे.

​अश्विनी बेलोशे यांच्या या महत्त्वाच्या निवडीबद्दल आमदार व माथाडी नेते शशिकांत शिंदे यांच्यासह पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी, स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आणि जावली तालुक्यातील ग्रामस्थांनी त्यांचे मनापासून अभिनंदन केले आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरदचंद्र पवार साहेब, राष्ट्रीय कार्याध्यक्षा खा. सुप्रिया सुळे, राष्ट्रीय अध्यक्षा फौजीया खान, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि आमदार शशिकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबईत पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी त्या प्रयत्नशील राहणार आहेत.

​आपल्या या निवडीबद्दल भावना व्यक्त करताना अश्विनी बेलोशे म्हणाल्या की, पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी आणि प्रदेशाध्यक्षा अॅड. रोहिणीताई खडसे यांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास माझ्यासाठी अत्यंत मोलाचा आहे. हे पद म्हणजे माझ्या सामाजिक प्रवासाला पक्षाने दिलेली पोचपावती आणि एक अनमोल भेट आहे. पक्षाची ध्येय-धोरणे सर्वसामान्यांपर्यंत आणि विशेषतः महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी तसेच महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी या पदाला साजेसे आणि निष्ठेने काम करेन, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Facebook
X
WhatsApp
Telegram

203K

Facebook Fans

103K

Followers

203K

Subscriber

113K

Followers